Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आत्महत्यांचे (Suicide) सत्रही सुरूच आहे. अशातच अहमदनगर (Ahmadnagar) येथील तरुणाने नाशिकमध्ये एका हॉटेलात स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 


नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) हद्दीत हि घटना उघडकीस आली आहे. तौसिफ हबीब पठाण असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौसिफ़ हा मुळ अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी-शिर्डी रस्त्यावरील दंडवते वस्तीवरील रहिवासी होता. विशेष म्हणजे तौसिफ़ हा असलेल्या उच्चशिक्षित नोकरदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तौसिफ़ हा राहाता तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात मेंटनेन्स इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. त्याने नैराश्यातून नाशिकच्या मुंबई नाका भागातील एका हॉटेलमध्ये स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. पठाण हा मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये आला होता. त्याने मंगळवारी येथील हॉटेलमध्ये एक खोली घेतली होती. त्यानंतर बुधवारी त्याने चेकआउट केले ; मात्र तो पुन्हा संध्याकाळी हॉटेलमध्ये वास्तव्यास आला. 


दरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याच्या खोलीतून धूर व आगीच्या ज्वाला दिसू लागल्याने हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव मुख्यालयातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझविली. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पलंगावर संपूर्णत: जळालेल्या अवस्थेत पठाण आढळून आला. 


घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मुंबई नाका पोलिसांनी धाव घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात त्याने मृत्यूपूर्व लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत त्याने केवळ ‘ मै तुम्हारे लिये कुछ नहीं कर सका....’ एवढेच वाक्य लिहिलेले असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांनी सांगितले. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी माहिती कळविली. पठाण याचा भाऊ अकरम हबीब पठाण याच्या ताब्यात मृतदेह सोपविला. 


नाशकात आत्महत्यांचे सत्र 
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे सत्र वाढलेले दिसून येते. दररोज दोन ते तीन आत्महत्या होत आहेत. यामध्ये बहुतांश तरुण तरुणींचा समावेश असल्याचे दिसते. अनेकदा नैराश्यातून, कौटुंबिक वादातून आत्महत्या वाढल्याचे पोलिसांच्या निदर्शनातून समोर आले आहे.