वाशिम : वाशिम (Washim News) जिल्ह्याच्या वनपरिक्षेत्रातील मोठ्या क्षेत्रात सागवानाचे झाड धोक्यात आले आहेत. या झाडांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय. अळ्यांनी हिरव्यागार झाडांची पाने खाल्ल्याने पानांची चाळण झाली आहे. हिरवीगार पाने अळ्यांमुळे पिवळी पडलीत आणि झाडावरून अळ्या पडताना दिसतात. त्यामुळे सागवान (Washim Sagwan Wood) वृक्षांच्या वाढीस मोठा धोका निर्माण झाला आहे. सागाच्या झाडांना खूप मागणी आहे. मात्र, अळ्यामुळे सागवान वृक्षांची (Washim Teak Wood) वाढ संकटात आल्याने याचा परिणाम भविष्यात मागणी-पुरवठ्यावर होऊ शकतो.

Continues below advertisement


सागवानाचे झाड म्हटलं की त्याचा टिकाऊपणा ही त्याची ओळख आहे. त्याला कीड लागत नाही म्हणून त्याचा वापर सर्वात जास्त केला जातो .मात्र,आता ही झाडच संकटात सापडली आहेत. या झाडांवर अळ्यांनी हल्ला चढवला आहे. सागवानाच्या झाडांवर या अळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकीकडे निसर्गाने हिरवा शालू पांगरला आहे, तर दुसरीकडे सागवानावर झालेल्या अळ्यांच्या प्रादुर्भावमुळे सागवानाचा रंगच बदलला आहे. या अळ्यांचा प्रकोप इतका वाढला आहे की या अळ्यांनी झाडांची पान खाऊन अक्षरशः चाळण केली आहे.


अळ्यांच्या प्रादुर्भावमुळे सागवानाचा रंग बदलला


 एक नाही दोन नव्हे तर शेकडो एकरवरील हजारो सागवानाची झाड या अळ्यांच्या प्रकोपांच्या आहारी गेल्या आहेत. मागील काही दिवसापासून या सागवानाचे रूपच  भकास झाले आहे.  वनसंपदा जपली पाहिजे म्हणून एकीकडे शासन झाड लावा झाडे जगवा म्हणते तर वनपरिक्षेत्रात उभी असलेली ही शेकडो झाडे या अळ्यांच्या प्रकोपाची बळी ठरत आहे. यामुळे वन विभाग ही हताश  झाला आहे.  कारण क्षेत्र मोठं आहे त्यामुळे उपाययोजना  करणे कठीण असल्याचं सांगितल्या जाते. सगळ्यात टिकाऊ आणि महागडं लाकूड म्हणून ओळख आहे. मात्र बदलत्या काळाच्या ओघात निसर्ग ही  बदलत चालल्याने त्याचे परिणाम मानवी जीवनावर दिसत आहे.  त्याच परिणाम सध्या  वृक्षांवर दिसत आहे.  


 सागवानाला कीड लागत नाही


देश विदेशात मोठ्या प्रमाणात लाकडांची मागणी (wood demand) वाढली आहे. त्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्या वतीनं वृक्ष लागवडीस प्रोत्साहन दिलं जात आहे सागवान लाकूड हे ग्रेड थ्रीचं म्हणजे सर्वोत्तम लाकूड आहे. या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव होत नाही. पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते.  या सागवानात टेक्टॉनीन हा ऑइल कन्टेन्ट खूप जास्त आहे त्यामुळे याला कीड लागत नाही आणि लाकडात खूप चमक असते.