Washim News : वाशिममध्ये (Washim) पोलीस आणि जनतेमध्ये सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. पोलिसांचे कर्तव्याबरोबरच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ सुदृढ होण्यासाठी आता सायकलीवरुन पेट्रोलिंग (Petrolling) करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस अधिक्षक बच्चन सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सायकल पेट्रोलिंग’ हा अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. वाशिममध्ये पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या या अभिनव उपक्रमाची चर्चा सध्या संपू्र्ण वाशिम जिल्ह्यात सुरु आहे. पर्यावरण आणि पोलिसांचे आरोग्य या दोन हेतूंची सांगड घालत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 


शहरात आणि गावामध्ये अरुंद रस्ते,  गल्लीबोळातून सायकलद्वारे पेट्रोलिंग करणे सहज शक्य होते. त्यामुळे गुन्ह्यांवर  नियंत्रण घालण्यास आणि त्यांवर प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते. यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उद्दिष्ट्य साध्य होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद देखील व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील सराफा लाईन, आठवडी बाजार, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे, प्रार्थनास्थळे तसेच शाळा-महाविद्यालय सारख्या महत्वाच्या ठिकाणी सायकलद्वारे पोलीस आता गस्त घालणार आहेत. त्यामुळे सायकलने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये पोलिसांप्रती एक आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होऊ शकते. 


सायकल पेट्रोलिंगच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना कर्तव्याबरोबरच शारीरिक आणि मानसिक स्वास्थाची सांगड घालता येणार आहे.  त्याचबरोबर प्रदूषणामुळे होणारी पर्यावरणाची हानी देखील टाळता येणं शक्य होणार आहे. समाजामध्ये निसर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्ताने पोलिसांकडून देण्यात येणार आहे. ‘सायकल पेट्रोलिंग’ करिता सहा तालुका स्तरावरील पोलीस स्थानकांमध्ये तीन आणि इतर सात पोलीस स्थानकांमध्ये दोन अशा एकूण 32 सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. 


यावेळी अमरावती परिक्षेत्राचे  विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी  जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील आढावा घेतला. तसेच त्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत इतर पोलीस सहकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन देखील केले आहे. वाशिम पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. त्यामुळे वाशिममधील पोलिसांचा हा अनोखा उपक्रम सध्या जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आता पोलिसांना जिल्ह्यातील समस्यांवर लक्ष ठेवणं देखील सोपं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


हेही वाचा : 


'हे बिहारचं औरंगाबाद तर नाही ना!'; आता भरदिवसा सराफा व्यापाऱ्याला लुटलं, चाकूच्या धाकावर 12 लाखाचे दागिने लांबवले