Washim News : वाशिम :  संत सेवालाल महाराज यांची आज 284वी जयंती आहे. यानिमित्त वाशिमच्या (Washim News)  पोहरादेवी येथे बंजारा भाविकांची मांदियाळी एकवटणार आहे. त्याचप्रमाणे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांच्या धर्मपीठाचे पीठाधीश म्हणून वंशज असलेले कबीरदास महाराज यांची घोषणा करण्यात आली आहे. आज त्यांचा राजतिलक सोहळा हजारो बंजारा भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, दोन दिवसाआधीच याठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेक विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय राठोड हेसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. त्यापार्श्वभूमीवर पोहरादेवीत संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी होणार आहे.


संत सेवालाल महाराज यांचे वंशज संत नामदेव महाराज मुख्य पीठाधीश यांचे उतराधिकारी महंत कबीरदास महाराज यांची वंशज म्हणून घोषणा करण्यात आली आहे.  संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंती दिनी बंजारा समाजाचे मुख्य पीठाधिश नामदेव महाराज हे स्वतः तिलक करून आपली जबाबदारी देणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे कबीरदास महाराज यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा समाजाच्या बैठकीत करण्यात आली. संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेल्या आणि 13 कोटीपेक्षा अधिक समाज बांधव असलेल्या बंजारा समाजाचे दैवत असलेले क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या कुळातील पोहरादेवी शक्तिपीठाचे अधिपती संत नामदेव महाराज हे वयोवृद्ध झाल्याने शक्तिपीठाचे  उत्तराधिकारी म्हणून त्यांचे मोठे पुत्र कबीरदास महाराज यांची बैठकीत घोषणा करण्यात आली. 


पाहिले धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या निधनानंतर  त्यांच्या आश्रमाचे उत्तराधिकारी म्हणून महंत बाबूंसिंह महाराज यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या धर्मपीठाची सर्वस्व कारभार हे कबीरदास महाराज पाहणार आहेत. मात्र धर्मगुरू बदलल्याने समजला नेमकी नवीन कोणती दिशा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   


वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे.  संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे.   संपूर्ण बंजारा बांधवांचे दैवत असलेल्या सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक पोहरादेवी या ठिकाणी दाखल होत असतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात. म्हणून बंजारा समाजातील प्रत्येक नागरिकांच्या घराघरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बाबूलाल महाराजांचा फोटो लावून पोहोरादेवीची पूजा करतात.