Washim Rains : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Rain) शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात 5 जुलै ते 22 जुलैपर्यंत झालेल्या पावसामुळे 45 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 769 हेक्टर जमीन खरडून गेली असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग या पिकांचा समावेश आहे. तर बेलोरा तालुक्या पुराचे पाणी गावात शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. 


बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत


राज्यात यंदा मान्सून उशीरानेच दाखल झाला आहे. एरवी जूनच्या मृग नक्षत्रामध्ये खरिपाची पेरणी शेतकरी करतात. वाशिम जिल्ह्यात देखील यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला देखील उशीर झाला आहे. आता कसंबसं पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतात पिकं उगवायला सुरुवात केली होती. पण मुसळधार पावसामुळे उगवलेल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. मागील पंधरा दिवसांपासून  वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुका, मानोरा तालुका आणि मंगरुळपीर तालुक्यात पावसाने दमदार बॅटिंग केली. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळालं. 


मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला


कारंजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळालं. अनेक नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले. त्यामुळे या नदीनाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याचं पाहायला मिळालं. यामुळे अनेक गावातील रस्ते देखील बंद झाले होते. दरम्यान नदीकाठच्या गावांना याचा सर्वात जास्त फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान


जिल्हयात 5 जुलै ते 22 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे जवळपास 45 हजार 874.38 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल मिळाला आहे. तर कारंजा तालुक्यातील येवता मंडळातील 2 हेक्टरवरील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. कारंजा तालुक्यात 12 जुलै झालेल्या पावसामुळे येवता आणि उंबर्डा (बाजार) महसूल मंडळातील  36 हेक्टरवरील कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. 20 जुलै रोजी मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा मंडळातील 60 हेक्टरवरील सोयाबीन आणि तूर आणि 22 जुलै रोजी मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, शेंदूर्जना, कुपटा, गिरोली व उमरी (बु.) मंडळातील 15 हजार 295.88 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद आणि मूग पिकांचे नुकसान झाले आहे.  


वाशिम जिल्ह्यात 22 जुलै रोजी चोवीस तासांत सकाळी 10 वाजेपर्यंत 33 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सकाळपासूनच सुरु असलेला संततधार पावसामुळे पशुधनचा मृत्यू आणि घरांची पडझड झाल्यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पंचनामे करुन तातडीने मदत करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 


हे ही वाचा : 


Palghar Rain: जगण्यासाठी 'जीव' पणाला! मोखाड्यातील 'त्या' चार गावपाड्यांचा संपर्क तुटला; प्रवास झाला जीवघेणा