Palghar News : अन्न, हवा, पाणी या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे रस्ता, वीज आणि पाणी या गाव-पाड्याच्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत गरजांअभावी माणूस आणि गावही जगू शकत नाही. यामुळे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही जर एखाद्या गावाला मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी झटावं लागत असेल तर हे नेमक्या कोणत्या विकासाचं द्योतक आहे? हा खरा सवाल आहे, कारण पालघरच्या (Palghar) मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायती मधील शेड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभूळपाडा या एकूण 500 हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावपाड्यांना रस्ताच (Road Issue) नाही. उन्हाळ्यात नदी आटलेली असल्यामुळे कसाबसा प्रवास होतो, मात्र पावसाचे प्रमाण वाढल्यास मात्र या पाड्यांचा आणि जगाचा संपर्कच तुटत असल्याचं भयान वास्तव समोर येत आहे.


गरजेच्या वस्तू आणणं देखील कठीण


मोठ्या प्रमाणावर पावसामुळे गावपाड्यांजवळील नदी ओसंडून वाहते आणि त्यामुळे ती पार करताच येत नाही. पावसाच्या दिवसांत या गावपाड्यांचा संपर्क तुटतो, अशा वेळी जगण्यासाठीच्या गरजेच्या वस्तू आणणं तर सोडा, मात्र शाळा, दवाखाना या सुविधा देखील मिळत नाहीत. त्यात आता तर गावकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे.


अर्ज देऊनही पूल बांधला जात नाही


काही महिन्यांपूर्वी गावांतून वाहणाऱ्या नदीवर एका संस्थेकडून मोठा बंधारा बांधण्यात आला, त्यामुळे पाणी कमी असेल तर यावरुन दुसऱ्या बाजूला जाणं-येणं शक्य होतं. मात्र पाण्याचं प्रमाण वाढल्यास हा प्रवास अधिक धोक्याचा होतो. जगण्यासाठी बाहेत तर पडावं लागेल, या मजबुरीने येथील महिला, बालकं या बंधाऱ्यावरुन ये-जा करण्याचा प्रयत्न करतात. पण हे कधी त्यांच्या जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी यासंबंधी पाठपुरावा केला, अर्जही दिले, मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. 


ग्रामस्थ संतप्त


तुम्ही कितीही रस्ते मागा, पूल मागा, काहीही मागा, शासन दरबारी यासंबंधीची कागदं लवकर हलत नाहीत. मात्र एखादा बळी गेला की मात्र सर्वच जागे होतात. यामुळे शासनाला या गावपाड्यांना पूल द्यायला एक तरी बळी द्यावा लागेल की काय? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.


बळी गेल्यावरच सरकारला जाग येणार?


गावांच्या स्थितीवरुन कुर्लोद ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन मोडक यांनी देखील कैफियत मांडली आहे. आम्ही वेळोवेळी मागणी करुनही पुलाचा विषय अद्याप सुटलेला नाही. पावसाळ्यात जीवघेणा प्रवास करावा लागतो. घरात बसून उपाशी राहायचं का? असा प्रवास करुन जीव धोक्यात घालायचा का? असे प्रश्न आमच्यासमोर आ वासून उभे आहेत, असं उपसरपंचांनी सांगितलं. शासन बळी गेल्यावरच रस्ते पूल देणार का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 


हेही वाचा:


Rain Update: मुंबई-पुण्यात आज मुसळधार पाऊस; 'या' 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पाहा तुमच्या विभागातील पावसाची स्थिती