वाशिम: बाजारभावातील चढउताराचा अभ्यास करून योग्य वेळेची निवड करत शिमला मिरचीच्या (Capsicum) उत्पादनातून वाशिमच्या (Washim) युवा शेतकऱ्याने आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग शोधला आहे. एका एकरमध्ये सव्वा दोन महिन्यात शंभर क्विंटलचं उत्पन्न घेऊन लाखमोलाची कमाई शेतकऱ्याने केली आहे.
योग्य नियोजन आखून शिमला मिरचीची शेती
निसर्गाचा लहरीपणा, यांत्रिकीकरण, रासायनिक खताचे वाढलेले दर आणि सातत्याने चढउतार होत असलेले बाजार भाव, यामुळे शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. मात्र, योग्य वेळीच नियोजन करुन आणि बाजार भावाचा चढउतार पाहता व्यवस्थित नियोजन केल्यास शेतीतून भरघोस उत्पादन घेत योग्य भाव कसा मिळवला जातो, हे सिद्ध केलं आहे वाशिमच्या जवळा येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर गवळी यांनी. शिमला मिरचीचं पीक घेत एक एकरातून चांगलं उत्पन्न शेतकऱ्याने काढलं आहे.
कशी केली लागवडीस सुरुवात?
एका एकरात शिमला मिरचीची शेतात नांगरणी करून बेड तयार करण्यात आले आणि त्यावर मल्चिंग पेपर टाकून लागवड करण्यात आली. 15 जूनला या शिमला मिरचीची लागवड करण्यात आली. आज या शिमला मिरचीला सव्वा दोन महिने झाले आहेत, यात ज्ञानेश्वर गवळी यांना पहिला तोडा 23 क्विंटलचा निघाला, त्याला 32 रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर 33 क्विंटलचा दुसरा तोडा तोडून त्याला 28 रुपये दर मिळाला. तर तिसरा तोडा जवळपास 40 क्विंटलचा निघाला असून यात त्यांना 25 रुपये भाव मिळाला आहे, त्यामुळे सव्वा दोन महिन्यात 96 क्विंटल शिमला मिरचीच्या उत्पादनातून त्यांना सरासरी तीन लाख रुपये मिळाले आहेत.
दीड लाख खर्च करुन आतापर्यंत दुप्पट नफा
शिमला मिरचीसाठी ज्ञानेश्वर गवळी यांना जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. सध्या फवारणी किंवा तोडणीसाठीच खर्च येतो. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली मिरची ही व्यापाऱ्याला शेतातून विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किलोमागे सात ते आठ रुपये फायदा होत आहे. आपली मिरची मार्केटमध्ये न नेल्यामुळे त्याचे गाडी भाडे वाचले आहे, त्यामुळे त्यांच्या पैशांची दहा टक्के बचत होत आहे. ज्ञानेश्वर गवळी यांनी आपल्या शेतातून आतापर्यंत मिरचीचे तीन तोडे केले आहेत, अजून चार ते पाच तोड त्यांना अपेक्षित आहे, त्यामुळे मिरचीतून येणारं उत्पन्न हे तोडणी खर्च वगळता निव्वळ नफा राहणार आहे.
हेही वाचा: