Samrudhhi Highway Accident वाशिम : समृद्धी महामार्ग (Samrudhhi Highway) प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. असाच एक भीषण अपघात समृद्धी महार्गावरील वाशिमच्या (Washim) कारंजाजवळ लोकेशन क्रमांक 173 वर झाला आहे. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसने ट्रकला जोरदार धडक(Accident) दिली आहे. ज्यामध्ये बसमधल्या 16 ते 17 प्रवासी जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा अपघात 1 फेब्रुवारीच्या रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास झाला. समृद्धी महार्गावर प्रवास करताना अचानक नीलगाय रस्त्यावर आडवी आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना असलेला महामार्ग असल्याचा कितीही दावा केला तरी, त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. 


समृद्धी महामार्गावर आली नीलगाय  


पुजा ट्रॅव्हल नामक एक खाजगी बस 1 फेब्रुवारीच्या रात्री नागपूरवरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान मध्यरात्री ही बस समृद्धी महार्गावरील वाशिमच्या कारंजा जवळ लोकेशन क्रमांक 173 जवळ आली असतांना बसच्या सामोर असलेल्या एका ट्रकपुढे अचानक निलगाय आली. ट्रकचाकाने या नीलगायला वाचविण्यासाठी जोरदार ब्रेक मारून ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला आणि ट्रक नियंत्रणात आणला. सुदैवाने यात त्या नीलगायचा जीव वाचला. मात्र अचानक ट्रकने ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या बसला अंदाज न आल्याने बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. भरधाव बसने ट्रकला धडक मारल्याने बसमधल्या 16 ते 17 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातातील जखमींना अमरावती, वर्धा अकोला इथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. 


अपघातांची मालिका सुरूच 


समृद्धी महामार्गावर 25 जानेवारीच्या पहाटे एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. चालकाला झोप लागल्यामुळे बाजूच्या कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला होता. त्यानंतर  26 जानेवारीच्या रात्री पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली होती. या धडकेत एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना वाशिमच्या मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्णतः चुराडा झाला होता. त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका काही केल्या थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे यातील सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाले आहे.


समृद्धी महामार्गावर अपघात पहाटे किंवा मध्यरात्री 


समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात हे पहाटे किंवा मध्यरात्री झाले आहे. या महामार्गावर जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झाले असून जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्ग हा जरी राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग असला तरी या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे सत्र वाढतच चालले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या