Mumbai–Nagpur Expressway: समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी (Nagpur Shirdi) या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) प्रवासाची वेळ वाचत असला तरी वाहनांच्या अपघातांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली होती. अतिवेगाने धावत (Over speed) असलेल्या वाहनांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी स्पीडगनच्या (Speedgun) माध्यमातून कारवाईस सुरू केली आहे. विदर्भात 650 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून 9 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाच्या 520 किलोमीटरच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. प्रशस्त महामार्गामुळे वाहनधारकांना कमी वेळात लवकर प्रवास करणे शक्य होत आहे. मात्र, प्रवासादरम्यान वाहनांचा वेग हा प्रति तास 120 हून अधिक असतो. त्यामुळे वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. सुस्साट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी पोलीस खात्यावर देण्यात आली आहे. राज्य महामार्ग पोलिसांनी स्पीडगनद्वारे गेल्या महिनाभरात 650 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत 173 वेगवान वाहनांवर कारवाई करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात 45 वाहनावर कारवाई करण्यात आली.
विदर्भात 650 वाहनांवर कारवाई
समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील हद्दीत 650 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमधून 9 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. नो पार्किंगसह महामार्गावर सेल्फी काढणाऱ्या वाहन चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीडगन कार्यान्वित झाले नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अति वेगवान वाहनांवर लगाम घालण्याची धुरा महामार्ग पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात, प्राथमिक माहितीनुसार, विदर्भात 650 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर, शिर्डी औरंगाबाद आणि जालना विभागातील कारवाईचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अतिवेगामुळे वाहन चालक स्वत: सह प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याने राज्य महामार्ग पोलीस खात्याने कारवाईचा बडगा उचलण्या सुरुवात केली आहे.