Washim News : वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट लगत असलेल्या अडाण नदीवरील (Adan River) प्रकल्पात दोन अज्ञात मृतदेह सापडले. आज (4 ऑगस्ट) सकाळी ही घटना उघड झाली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या मृतांमध्ये एक महिला तर एक पुरुष असल्याची माहिती आहे. 


यापूर्वी याच प्रकल्पात 29 मे रोजी दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तर 10 जून रोजी ही एका मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा दोन मृतदेह आढळल्याने नेमकी हत्या आत्महत्या की अपघात हे कळू शकलेले नाही. पोलीस तपासाअंती सर्व माहिती उघड होणार आहे. 


दरम्यान सर्वधर्म आपत्कालीन संघटनेने मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. या दोन मृतदेहांपैकी तरुणीची ओळख पटली आहे. खुशी (वय 20 वर्षे) असं या तरुणीचं नाव असून ती कारंजा इथली रहिवासी आहे. तर तरुण हा दापुरी गावातील असल्याचं कळतं.


10 जून रोजी पिकनिकसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा तलावात पडून मृत्यू
पिंपरी फॉरेस्ट तलावात पिकनिकसाठी आलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 10 जून रोजी घडली होती. शाळेला सुट्ट्या असल्याने तलाव परिसरात फिरण्यासाठी आली असता ही घटना घडली. ईश्वरी गजानन भागव असं या तरुणीचं नाव होते. तीर अमरावतीच्या तिवसा जिल्ह्यातील होती. ईश्वरी तिच्या मित्र-मैत्रिणीसह फिरण्यासाठी आली होती.  


29 मे रोजी दोन तरुणींचा धरणात बुडून मृत्यू
याच तलाव क्षेत्रात दोन 18 वर्षीय तरुणींचा पाण्यात पाय घसरुन मृत्यू झाल्याची घटना 29 मे रोजी घडली होती. या दोन्ही तरुणी कारंजा दहिपुरा इथल्या रहिवासी होत्या. शाफीआ नासीर अली आणि उजमा अनिस अन्सारी अशी दोन तरुणींची नावं आहे. कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंजा इथल्या या दोन्ही तरुणी पिकनिकसाठी पिंपरी फॉरेस्ट गावानजीक अडाण धरणावर गेल्या होत्या. यावेळी पाय घसरुन दोघीही त्या धरणात पडल्या. पोहता येत नसल्याने धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला.