वाशिम : उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करून शिंदे गटात गेलेल्या भावना गवळी यांच्यासमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. 


खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा 2013 साली घटस्फोट झालेला होता. भावना गवळी यांच्याशी विभक्त झाल्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यांनी भावना गवळी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रशांत सुर्वे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर खासदार भावना गवळी यांच्या समोर एक तगडं आव्हान मतदारसंघात उभं राहण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कॅप्टन प्रकाश सुर्वे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "2014 सालीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मी उद्धव ठाकरें यांना भेटलो होतो. पण परिस्थिती तशी नाही असं त्यावेळी उद्धव ठाकरेंचे मत होतं. त्यावेळी मला पक्षाकडून काही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला."


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत जायला हवं अशी विनंती केली होती. एकीकडे बहुतांश आमदार शिंदे गटात सामिल होत असताना भावना गवळी यांचाही ओढा हा शिंदे गटाकडे होता. त्यामागे भावना गवळी यांच्यामागे लागलेला ईडीचा ससेमिरा हे कारण असल्याची कुजबूज होती.


महत्त्वाच्या बातम्या :