वाशिम : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारसंघात प्रबळ दावेदार असल्याचं सांगत दावा करतोय. मात्र, महायुती असो की महाविकास आघाडी असो, जागा एक आणि दावे  अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात विधानपरिषदेच्या आमदार भावना  गवळी या  निवडणूक लढवण्यासाठी  इच्छुक आहेत. रिसोडची जागा शिवसेनेकडे आली आणि पक्षाने आदेश दिला तर आपण या ठिकाणाहून निवडणूक लढवू असं सांगत भावना गवळी यांनी या जागेवर दावा केला आहे. 


पक्षाने आणि महायुतीच्या नेत्यांनी आदेश  दिल्यास  वाशीम जिल्ह्यातील  तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठीसाठी काम करणार असल्याचं आमदार भावना गवळी यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं.


रिसोडमध्ये काँग्रेसचा आमदार


वाशीम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा  मतदारसंघ आहेत.  वाशीम, कारंजा, रिसोड यापैकी गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये वाशीम, कारंजा  मतदारसंघात भाजपचे  उमेदवार जिंकून आले. तर रिसोड मतदारसंघात काँग्रेस आमदार निवडून आले आहेत. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा


असे असले तरी महायुतीमध्ये कारंजा मतदारसंघावर राष्ट्रवादी  काँग्रेस अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे . येथील विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांच दीर्घ आजाराने   निधन झाल्यामुळे  दिलीप वळसे पाटील यांचे  मेहुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार  स्व. प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके  निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे महायुतीमध्ये  वाद होण्याची चिन्हं आहेत.


भावना गवळी इच्छुक


वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार लखन मलिक यांनी विजयी हॅट्रिक  केली आहे. त्यामुळे या जागेवर भाजपचा  दावा आहे. तर रिसोड मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट दावा करत असल्याने   आता  महायुतीमध्ये या जागेवर वाद होण्याची चिन्ह दिसतात. या मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसने आपला झेंडा कायम ठेवला. 2019 मध्ये  युतीमध्ये रिसोड मतदारसंघ हा शिवसेनेला सुटला होता.  त्यामुळे आमदार भावना गवळी आता  या मतदारसंघासाठी इच्छुक आहे.


रिसोडचा राजकीय इतिहास


माजी महिला बालकल्याण मंत्री सुभाष झनक 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून  गेले. त्यांनी भाजपचे आमदार विजयराव जाधव यांचा पराभव केला होता. तर सुभाष  झनक याचं 2013 मध्ये अकाली निधन झाल्या नंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा पोटनिवडणूक लागली आणि सहानुभूतीच्या लाटेत सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक निवडून आले. तर  विधानसभा निवडणुका 2014 आणि 2019  मध्ये  पुन्हा अमित झनक आमदार म्हणून निवडून आले.


1999  ते 2004 आणि 2004 ते 2009  या दोन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे विजयराव जाधव दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेल्याने भाजप या मतदारसंघावर दावा करतंय.


रिसोडवर महायुतीत भाजपचा दावा


गेल्या अनेक दशकांपासून या काँग्रेसमध्ये अनेक मोठे पद भूषवलेले  अनंतराव देशमुख यांनी गेल्या वर्षी  भाजप मध्ये  प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाबरोबर 50 हजार कार्यकर्तेसोबत घेऊन गेले त्यामुळे अनंतराव देशमुख यांचे  पुत्र  नकुल देशमुख हे निवडणुकीच्या  रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तसे त्यांनी  रणनीती आखली आहे. तर भाजपचे या मतदारसंघामध्ये  आमदार असलेले  विजयराव जाधव हे निवडणूक लढवण्यासाठी  इच्छुक आहेत.   तसे  महायुतीमध्ये ज्या पक्षाला जागा सुटेल त्यासोबत काम करणार असल्याचं नकुल देशमुख यांनी ABP माझाला बोलातान सांगितलं.


सध्या महायुतीमध्ये दोन्ही पक्षांची जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच  दिसतंय. तर काँग्रेसमध्ये अमित झनक याचं वजन असल्याने त्यांना प्रतिस्पर्धी नसल्याने या वेळी अमित झनक हे निवडणूक लढवणार आहेत. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढवणार ते स्वभिमानी शेतकरी संघटनेमुळे. दामोदर इंगोले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी अनेक आंदोलनं करून शेतकऱ्यांची मनं जिंकली.


2009  विधानसभा निवडणूक


रिसोड विधानसभा मतदारसंघात सुभाष झनक हे 51,234 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर  माजी खासदार  अनंतराव  देशमुख  यांचा  पराभव केला.


2014  विधानसभा निवडणूक


सुभाष झनक  हे विजयी झाले.


2019  विधानसभा निवडणूक


काँग्रेसचे अमित झनक हे विजयी झाले.