Bhandara News भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या(Lok Sabha Election 2024) अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यातील सीमेवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं चेक पोस्टची निर्मिती केली आहे. मात्र, भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी येथील निलज फाट्यावर उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर कर्तव्यावर असलेल्या दोन कर्मचारी चक्क मद्यप्राशन करून झोपी गेल्याचे आढळून आले आहे. दि. 6 एप्रिलला रात्रीच्या सुमारास निवडणूक निरीक्षक यांनी चेकपोस्टला भेट दिली असता ही बाब उघडकीस आलीय. त्यामुळं कर्तव्यात कसूरपणा केल्यानं दोघांही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांनी केली निलंबनाची कारवाई


भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश बजावले असून या दोघांवर पवनी पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्ह्याची नोंद ही करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्यामध्ये के. एल. कुंभारे हे पवनी पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी आहेत, तर सचिन पढाळ हे पाटबंधारे विभागात कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात वरिष्ठ लिपिक आहेत. मात्र, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


जादूटोण्याच्या संशयावरून महिलेस अमानुष मारहाण


वाशिम जिल्ह्याच्या धुंमका गावात जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका 50 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला करत अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गावातील दोन महिला आणि तीन पुरुषांनी मिळून हे कृत्य केल्याचा आरोप जखमी महिलेने केला असून मारहाण करणाऱ्या कुटुंबातील एका तरुणीला जादूटोणा केल्याचा संशय मारहाण करणाऱ्यांनी केला होता. त्या कारणावरून घरी कुणी नसल्याचा फायदा घेत घरी एकटी महिला असल्याचे पाहून हि मारहाण करण्यात आलीय. 


महिलेवर उपचार सुरु


यात लोखंडी रॉड, लाठीकाठी आणि चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप जखमी महिलेने केला आहे. जखमी महिलेवर सध्या वाशिमच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  तसेच महिलेचे दोन्ही हाताचे हाड आणि पायाचे हाड हि तोडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून अनसिंग पोलिसात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपी मात्र फरार असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या