Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal Washim Lok Sabha) मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सध्या पुढे आली आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अभिजित राठोड यांच्यासह प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.


विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपला नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल 4 एप्रिलच्या दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार आहे. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. 


वंचितला मोठा धक्का!


वंचित बहुजन आघाडीने 4 एप्रिल रोजी उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलून सुभाष खेमसिंग पवार यांच्या एवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधि दिली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल  केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून 38 उमेदवारांची 49 नामनिर्देशनपत्र  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले गेले. तर आज 5 एप्रिल रोजी या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे.


त्यामध्ये महायुतीतून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांची उमेदवारी देखील महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात असताना त्यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याने सध्याघडीला मंतदारसंघात नवा ट्विस्ट आल्याचे चित्र आहे. तर आतापर्यंत 38 उमेदवारांपैकी इतर किती उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरल्या जातात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


वंचितने किती उमेदवार बदलले?


वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता.


इतर महत्वाच्या बातम्या