Washim Crime News : जादूटोणा (Black Magic) करत असल्याच्या संशयावरून एका 50 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशीमच्या धुमका (Dhumka Washim) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, धुमका गावात सुला राठोड यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. गावातील जोजार कुटुंबियाच्या एका तरुणीवर जाधव कुटुंबातील लोकांनी जादूटोणा केल्याचा संशय जोजार कुटुंबियांना होता. यावरून गेल्या दोन महिन्यापूर्वी वाद निर्माण झाला होता. जोजार कुटुंबीयांनी सुला जाधव या पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र या घटनेशी माझा काही संबध नाही म्हणत सुला जाधव या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. 


घरी कुणी नसल्याचा फायदा घेत महिलेला मारहाण 


कैलास उत्तम राठोड, दुर्गाबाई भागवत जोजार, सचिन भागवत जोजार, सोनु भागवत जोजार, इलायती कैलास राठोड रात्रीच्या सुमारास पिडीतेच्या घरी जाऊन जबर जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप जखमी पिडीत महिलेने केला आहे. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत महिलेला मारहाण करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु


मारहाणीनंतर संशयितांनी महिलेला एका रिक्षात दवाखान्यात उपचारासाठी नेल्याचे समजते. गंभीर जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे महिलेची प्रकृती बिघडल्याने महिलेला वाशिमच्या एका खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. 


बंजारा समाजाच्या महिला आक्रमक


या प्रकरणी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बंजारा समाजाच्या महिला आक्रमक झाल्या असून पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक (Indraneel Naik) यांच्या पत्नी मोहिनी नाईक (Mohini Naik) यांनी पीडितेची भेट घेतली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी निवेदन देवून चौकशी करून आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


अकोल्यात कारागृह निरीक्षकाला धक्काबुक्की


अकोला येथे कुख्यात गुंड गजानन कांबळेला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी चक्क कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Beed Crime News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल


Mumbai Firing : सायन कोळीवाड्यात पैशाच्या व्यवहारावरून गोळीबार, एकजण गंभीर जखमी, आरोपी फरार