Wardha News Update : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे बैल पोळ्याच्या (Bail Pola 2022) दिवशीच गोठ्याला अचानक आग लागल्याने आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. सोबतच गोठ्यातील विविध साहित्याची राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पोळा सणाच्या दिवशीच हे संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त होतेय.
काल खांदा शेकून सोनवणे या शेतकऱ्याने बैलगाडी गोठ्यात बांधली. मध्यरात्री गोठ्याला मोठी आग लागली. यात बैलजोडीचा होरपळून मृत्यू झाला.
गावातीलच एक जण मध्यरात्री गोठ्याकडे गेला असता त्याला गोठा जळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने त्वरित सोनवने यांच्या घरी जाऊन माहिती दिली. सोनवने कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत गोठा जळून खाक झाला होता. गोठ्यात नुकतीच 92 हजार रुपयाला विकत घेतलेली बैलजोडी ठार झाली.
शेतीपयोगी साहित्य जळून खाक
गोठ्यात असलेले कुटार, 15 पोते रासायनिक खत आणि शेतीची सर्व अवजारे जळून खाक झाली. या बाबतची तक्रार आर्वी पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस, पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठी यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांतून हळहळ
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बैलपोळ्याचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर आपल्यासाठी राबणाऱ्या या बळीराजाच्या सवंगड्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोनवने यांनी देखील पोळा सणाची मोठी तयारी केली होती. परंतु, सणादिवशीच त्यांच्या सर्जा-राजीच्या जोडीचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या