Maharashtra Wardha Crime News : वर्ध्यातील (Wardha) रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आजोबांनी आपल्या नातीवरच अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांकडून नराधम आजोबाला अटक करण्यात आली आहे. 


वर्ध्यातील (Wardha News) रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजोबानंच अवघ्या 7 वर्षाच्या नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित चिमुकलीच्या आईनं यासंदर्भात रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीनं स्वतःच्या मुलीच्या मुलीवर अत्याचार केला असून याप्रसंगी पीडित चिमुकलीच्या आजोबांना अटक करण्यात आली आहे. स्वतःच्या वडिलांविरोधात पीडित चिमुकलीच्या आईनं पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. 


पीडित मुलीच्या आईनं तक्रार दाखल केल्यानंतर नराधम आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे. 25 ऑगस्ट 2022 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय घरी असतानाच हा निंदनीय प्रकार उघडकीस आला. पीडित चिमुकलीचे वडील मरण पावल्यानं ती आणि तिची आई आजोबांच्या घरी मागील दोन वर्षांपासून राहतात. 


पोलीस चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, नराधन आजोबा चार दिवसांपासून सतत चिमुकलीवर अत्याचार करत आहे. पीडित चिमुकलीची आई तिच्या आईसोबत घराच्या किचनमध्ये काम करत होती. एवढ्यात चिमुकलीची आजी काहीतरी कामासाठी बाहेरच्या खोलीत आली. त्यानंतर तिनं जे पाहिलं ते पाहून आजी जोरात किंचाळली. आजीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून हातातील काम टाकून चिमुकलीची आई धावत बाहेर आली. त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर आई आणि आजीनं चिमुकलीची विचारपूस केली. त्यावेळी गेल्या चार दिवसांपासून आरोपी आजोबा हा चिमुकलीवर अत्याचार करत असल्याची संतापजनक बाब समोर आली. 


आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल 


आजोबाचं धक्कादायक कृत्य समोर येताच, याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईनं थेट रामनगर पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली आहे. आरोपी वय 51 वर्ष याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरण अधिक तपास करत आहेत.