Bail Pola 2022 : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बैलपोळ्याचा (Bail Pola 2022) सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. जळगावात जैन उद्योग समूहातर्फे बैलांचे पूजन सालदार आणि शेतकऱ्यांचा सन्मान करत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


नागदार गावातील बैलपोळ्याची अनोखी परंपरा


बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या नागदरा गावात पोळा हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी गावातील सर्वच बैल सजविण्यात आले. सजविलेल्या बैलांना वाजत-गाजत गावातील महादेवाच्या मंदिरासमोर एकत्र आणण्यात आले. त्या ठिकाणी बैलांटं सामूहिक पूजन करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या. गेल्या 12 वर्षांपासून ही परंपरा चालत असल्याने या ठिकाणच्या बैलांनी स्वत:हूनच मंदिराला प्रदक्षिणा घातली. विशेष म्हणजे पंचक्रोशीतील लोक हा बैलपोळा बघायला नागदरा या गावी येतात.


हिंगोली जिल्ह्यातही बैलपोळा साजरा 


आज हिंगोली जिल्ह्यातही हा बैल पोळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रत्येक गावात शेतकरी बांधवांनी स्वतःच्या बैलांसोबत हा सण साजरा केला. गावातील देवी देवतेला शेतकऱ्यांनी बैलांबरोबर प्रदक्षिणा घालून पुढील वर्षी शेतात चांगले उत्पन्न निघू देत अशी प्रार्थना केली. बैलांना साजशृंगार करून हा बैलपोळा साजरा करण्यात आला. 


औरंगाबादमध्ये लकी ड्रॉ पद्धतीने पोळा सण साजरा


वैजापुर तालुक्यातील तलवाडा (नागवाडी) येथे लकी ड्रॉ पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. बऱ्याचदा पोळा सणाच्या मानापानावरुन वाद होतात. पोळ्याचा मान हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा या हेतूने प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. यावेळी लहान मुलाच्या हस्ते बाबासाहेब तातेराव मगर या शेतकऱ्याच्या नावाची चिठ्ठी निघाली. 


जळगावात जैन उद्योग समूहाची बैलपोळ्याची आगळी-वेगळी परंपरा; अनुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची उपस्थिती


जळगावात जैन उद्योग समूहातर्फे बैलांचे पूजन सालदार आणि शेतकऱ्यांचा सन्मान करत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित भारताचे अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यासह जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यावेळी उपस्थित होते. 


नांदेड जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा


नांदेड जिल्ह्यात या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


महत्वाच्या बातम्या :