Bail Pola 2022 : श्रावणात पिठोरी (Shravan 2022) अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा (Bail Pola) म्हणून साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारासाठी अत्यंत उत्साह असतो. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा'.


बैलपोळा दिनाचे महत्त्व :  


हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद आणि तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी किंवा सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. 


या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह :


या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्याला जमेल तितका त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात आणि पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची जुनी पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो आणि पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात आणि नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.


कर्नाटकी बेंदूर :


महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. 


महत्वाच्या बातम्या :