Wardha News : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील शुभम खडतकर या तरुणानं स्केटिंग करुन 16 तासांत तब्बल 300 किलोमीटरचे अंतर पार केलं आहे. तो सध्या भारतीय सैन्य दलात सेवा बजावत आहे. शुभमने नुकतेच नागपूर ते यवतमाळ हे अंतर एकूण तिनशे किलोमीटरचे अंतर 16 तासात पूर्ण केलं आहे. त्यामुळं त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात सुवर्ण मंदिर अमृतसर ते इंडिया गेट दिल्ली अशी स्पर्धा होणार आहे. हे 500 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी शुभम सज्ज झाला आहे. 




शुभम हा अठरा वर्षाचा असतानाच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून भारतीय सैन्य दलात नोकरीला लागला होता. त्याला स्केटिंगची प्रचंड आवड होती. आता स्केटिंग क्रीडा प्रकारात सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या स्पर्धेसाठी शुभम मेहनतीने सराव करत असून, ही स्पर्धा सुवर्ण मंदिर अमृतसर ते इंडिया गेट दिल्ली अशी एकूण 500 किलोमीटरच्या अंतरासाठी होणार आहे. शुभमने नुकतेच नागपूर ते यवतमाळ जाणे-येणे असे एकूण तीनशे किलोमीटरचे अंतर 16 तासात पूर्ण केले आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.




सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सराव 


कुठल्याही गोष्टीत पारंगत होण्यासाठी त्या कार्यात सहजता येण्यासाठी सराव हा अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळं शुभमने सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत स्केटिंगचा सराव केला. इच्छा तिथे मार्ग या उक्तीला न्याय देऊन ऊन, पाऊस, वाऱ्याची तमा न करता महामार्गावर सराव करत यवतमाळचा 5 किलोमीटरचा खडतर घाटसुद्धा त्याला पार करावा लागला. या खडतर प्रवासामध्ये त्याच्या कुटुंबियाची त्याला मोठी साथ आहे.




 
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचंय 


शुभम हा सैन्य दलात नोकरीला असतानाच तायकोंडो कराटे या खेळ प्रकारात राज्य पातळीवर प्रथम तर राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे. त्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले व आपल्या गावाचं नाव नोंदवायचे असल्याचं त्यानं सांगितलं. त्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असून, त्याची अत्यंत चिकाटीनं तयारी तो करत आहे.