Crime News : पुजाऱ्याच्या घरी चोरी करुन चोरट्यांनी रोख रक्कम आणि चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. ही घटना वर्धा जिल्ह्यातील मसाळा सेवाग्राम या ठिकाणी घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासात घटनेचा तपास करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन चोरीच्या घटनांचा खुलासा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला आहे. 


पोलिसांनी आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. घनश्याम ऊर्फ पोचन्ना देवराव देऊळकर (22), राजु ऊर्फ काल्या रामा दांडेकर (22) किसना रमेश राऊत (३०), बबलू ऊर्फ कटप्पा मधुकर धोतरे (२५), शंकर भगवान सातपुते (२२) (रा. सर्व वडर झोपडपट्टी, गिट्टीखदान, बोरगाव (मेघे), वर्धा.)  अशी अटक करण्यात आलेल्याआरोपींची नावे आहेत. आरोपींना पोलिसांनी वडार वस्ती, बोरगाव मेघे वर्धा येथून शिताफीने ताब्यात  घेतले. या गुन्ह्याबाबत पोलिसांनी सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. 



दरम्यान, 26 जून 2022 रोजी कथा पूजनचा व्यवसाय करणारे मुकेश रामनारायण तिवारी, (58) रा. गाडगेनगर (मसाळा, सेवाग्राम. जि. वर्धा ) हे पुजा अर्चा करण्यासाठी घराला कुलूप लाऊन बाहेर गेले होते. तेव्हा  कुणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या स्वयंपाक घराची सिमेंटची खिडकी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्याने घरातून नगदी 1 लाख रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ते घरी परतल्यावर चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी थेट सेवाग्राम पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करत पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. 


पोलिसांनी 12 तासात आरोपींना केली अटक  
        
स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 पथकाकडून सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. सदर गुन्हा हा  घनश्याम देऊळकर याने त्याच्या साथीदारासह केला असून, त्याचे राहते घरी चोरी केलेल्या मुद्देमालाची हिस्से वाटणी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या महितीवरुन छापा टाकून 
आरोपी घनश्याम देऊळकर, राजु दांडेकर,किसना रमेश राऊत, बबलू ऊर्फ कटप्पा मधुकर धोतरे,शंकर भगवान सातपुते यांनी अटक केली. आरोपींकडेून नगदी 93 हजार 700 रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने, गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या दोन स्प्लेंडर मोटार सायकल, 1 मोबाईल असा एकूण 1 लाख 85 हजार 315 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.