वर्धा : वर्धा जिल्ह्यातील (Wardha News)आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडित मतिमंद युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. हा निंदनीय प्रकार पीडित युवतीच्या भावाच्या लक्षात येताच त्याने आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यावरून 25 वर्षीय आरोपी अतुल सुरेश बोरीवार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी आणि तिचा भाऊ घरी होते. आईवडील शेतमजूर असल्याने नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते. काही वेळाने भाऊ देखील मित्रांसोबत बाहेर गेला. थोड्या वेळाने तो घरी परत आल्यानंतर आरोपी हा मुलीच्या घरात होता आणि प्रसंग बघून भावाला मोठा धक्काच बसला. पीडित युवतीच्या भावाला बघून आरोपी अतुल हा तिथून पळून गेला.
भावाने पोलिसांत दिली तक्रार
आरोपी घरातून पळून गेल्यानंतर पीडित युवतीच्या भावाने तिला काकूंकडे बसविले आणि आईला तातडीने घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने थेट आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पीडितेच्या गावतीलच आरोपी अतुल बोरीवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
संबंधित बातम्या :