Shivamurthy Sharanaru Police Custody : कर्नाटकातील (Karnataka) लिंगायत मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू (Lingayat Saint Shivamurthy Muruga) यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी आता चार दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये (Police Custody) करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. लिंगायत मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा यांना आता पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे.  


नेमकं प्रकरण काय आहे?


एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंत यांना अटक करण्यात आली आहे. शरनारू हे राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे महंत आहेत. जानेवारी 2019 ते जून 2022 या कालावधीत त्याच शाळेत शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीडित मुलींच्या तक्रारीनुसार, मुरुगा मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या 15 आणि 16 वर्षांच्या मुलींचे मागील साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. या प्रकरणी मठाच्या वसतिगृहाच्या वॉर्डनसह एकूण पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लिंगायत मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींनी म्हैसूरमधील ‘ओदनदी सेवा संस्था’ या एनजीओशी संपर्क साधला होता. ही संस्था मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण झालेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींचा बचाव करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करते. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच या संस्थेनं ही बाब जिल्हा बालकल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शनं


या घटनेनंतर जनतेकडून संताप व्यक्त होत असून कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शनं करण्यात आली. दोन अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर म्हैसूर शहर पोलिसांनी शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलींच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण होऊनही पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या