वर्धा: जिल्ह्यातील एका मेडिकलच्या औषध विक्रेत्याकडून सात हजार रुपयांची लाच (Bribe)स्वीकारताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकाला (Drug And Food Inspector) दलालासह रंगेहात अटक करण्यात आली आहे. नागपूर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने (Nagpur Anti Corruption Bureau) ही कारवाई केली आहे. सतीश हरिसिंग चव्हाण असं या औषध निरीक्षकाचं नाव आहे.


वर्ध्याच्या अन्न  औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकाने मेडिकल औषध विक्रेत्याकडून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी सात हजारांची रक्कम स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. वर्ध्यातील एका औषध विक्रेत्याकडे निरीक्षण करण्यासाठी औषध निरीक्षक सतीश हरिसिंग चव्हाण आला होता. दरम्यान निरीक्षणाचा अहवाल हा तक्रारदार असलेल्या औषध विक्रेत्याच्या बाजूने करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. 


वर्ध्याच्या केळकरवाडी येथील प्रवीण यादवराव पाथरकर या दलालाने सात हजार रुपयांची ही लाचेची रक्कम स्वीकारली. सापळा रचलेल्या पथकाने दलाल पाथरकर याला रंगेहात अटक केली. तर औषध निरीक्षक सतीश चव्हाण याला देखील लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. दोघांच्याही घराची झाडाझडती घेतली जात आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सुरू असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहात ही कारवाई झाल्याने सर्वांचे लक्ष या करवाईकडे वेधले गेले आहे.


पालघरमध्ये सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात


एका पोलीस कर्मचाऱ्याकडून लाच घेणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वर्ग  1  (सरकारी वकील) सुनील बाबुराव सावंत यांना 7000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधकविभागाकडून हुतात्मा स्तंभाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. सावंत हे गेल्या सात वर्षांपासून पालघर येथील नायालयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते.


पालघर जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक यांच्यावर सन 2015 मध्ये तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 3/ 15 कलम 376 भादंविप्रमाणे दाखल होता. जून 2023 मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोषमुक्त करण्यात आले होते. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने पदोन्नतीसाठी अर्ज केला होता. त्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पालघर त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता. तो अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यासंबंधी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोड करण्यात आली आणि 7000 रुपये लाचेची रक्कम ठरवण्यात आली. ती रक्कम स्वीकारताना  लाच लुचपत प्रतिबंधक  विभागाकडून हुतात्मा स्तंभा जवळ रंगेहाथ पकडण्यात आले.


ही बातमी वाचा: