वर्धा : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) विदर्भ ट्रॅव्हल्स भीषण अपघातातील  पीडित कुटुंबीयांना पाठिंबा देत निर्माण सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी आज वर्ध्यात (Wardha News) अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी स्वतःच्या शरीरावर पट्ट्याने फटके मारत आत्मक्लेश केला. समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 च्या रात्री बुलढाणा शहारानजीक विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानं अवघा महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला. या अपघातात तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये वर्ध्यातील प्रवस्यांची सर्वाधिक संख्या होती.


अपघातानंतर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. हा अपघात होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्याप या अपघातातील पीडित कुटुंबीयांना शासकीय मदत मिळाली नसल्याने पीडित कुटुंबीयांनी गेल्या 51 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले. त्यामुळे साखळी उपोषणातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निर्माण सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या शरीरावर फटके मारून आत्मक्लेश केला आहे.  


सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला


बुलढाणा शहारानजीक 1 जुलै 2023 च्या रात्री विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. त्या रात्री निष्पाप 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. पुणे - मुंबईकडे करिअर करण्यासाठी निघालेले वर्ध्यातील तरुण-तरुणी झोपेतच होरपळले. अपघातात कुणाची आई, कुणाची बहीण तर कुणाचा मुलगा हिरावला गेला. आज या घटनेला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.


घटनेनंतर केवळ पाच लाख रुपये मदत देऊन तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. पण अद्याप मदत पोहचलीच नसल्याचे पीडितांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पीडित कुटुंबीयांना शासकीय मदत मिळाली नसल्याने कुटुंबीयांनी गेल्या 51 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले. मात्र शासनाने अद्याप दखल न घेतल्याने या पीडित कुटुंबीयांना आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


आंदोलकाचा आत्महत्येच्या इशारा


निर्माण सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी आज वर्ध्यात अर्धनग्न होत स्वतःच्या शरीरावर पट्ट्याने फटके मारत आत्मक्लेश आंदोलन केले आहे. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत लक्ष वेधण्याचे प्रयत्न आंदोलकांनी केलं. यासह आंदोलन मंडपात एका आंदोलकाने गळ्याला फाशीचा दोर लावत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तैनात पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेतले. चंद्रशेखर मडावी असे या आंदोलकाचे नाव आहे.


इतर महत्वाच्या बातम्या