Wardha News : वर्ध्याच्या (Wardha) एमआयडीसी परिसरातील शासकीय दुग्ध व्यवसाय (Dairy Business) विभागातील प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. एकेकाळी 16 हजार लिटर दुधावर प्रक्रिया (Processing of milk) केली जाणाऱ्या या दुग्धशाळेत सध्या कमालीची शांतता आहे. सर्व मशीन आणि वस्तू या धूळखात पडल्या आहेत. एखादी पडीक इमारत वाटावी अशी अवस्था या दुग्धशाळेची झाली आहे.


दुग्धशाळेची दयनीय परिस्थिती 


तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली बॉयलर मशीन दुरुस्त करण्याकरिता वेळ लागला तसेच दुधाचे शासकीय दर कमी असल्याने शेतकरी इकडे वळत नाहीत. परिणामी सर्व कार्यच ठप्प  झाले आहे. गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेल्या, गोरसपाकसाठी विदेशातही प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्याच्या दुग्धशाळेत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मागच्या सरकारमध्ये राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार हेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तरीदेखील शासकीय आणि प्रशासकीय उदासीनतेला ही दुग्धशाळा बळी पडली आहे.




सर्व यंत्रणा ठप्प, जबाबदार कोण?


जून महिन्यात इथल्या बॉयलर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्याला दुरुस्त करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळं त्या कालावधीत शेतकऱ्यांकडून दूध संघाकडे येणाऱ्या दुधाची विक्री दिनशा, मदर डेअरी, हिंदुजा, हल्दीराम यांसारख्या खासगी कंपन्यांकडे केली गेली. तिकडे दुधाला शासकीय दराच्या तुलनेत जास्त दर मिळाल्यानं शेतकरी शासकीय दुग्धशाळेत दूध विक्री करत नाहीत. त्यामुळं सर्व यंत्रणा ठप्प पडली असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


दुधाला मिळणाऱ्या कमी दरामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कल खासगी दूध केंद्राकडे वाढला आहे. शासकीय खरेदीपेक्षा तिकडे त्यांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकररी खासगी दूध संघाकडे दुधाची विक्री करत आहेत. त्यामुळं वर्ध्याच्या दुग्धशाळेत सातत्यानं दुग्ध संकलनात घट होत गेली.




असे घसरले दूध संकलन


2018 साली 12 हजार लिटर
2019 साली 11 हजार लिटर
2020 साली 8 हजार लिटर 
2021 साली 5 हजार लिटर
जून 2022 साली 2 हजार 800 लिटर 


कमी दराचा शेतकऱ्यांना फटका


शासनाने दुधाच्या दरात वाढ केली नाही. त्यामुळे पशुपालकांना खासगी दूध डेरीचेच दर परवडणारे आहेत. त्यामुळं शासनाचा सहकार तत्वांवरील दुग्ध व्यवसाय मोडकळीस आला आहे. दुधाच्या 3.5 फॅटला 25 रुपये 30 पैसे इतकाच शासकीय दर आहे. तर खासगी डेअरीमध्ये दुधाचे दर 32 ते 35 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळं गोपालक शेतकरी खासगी कंपन्यांकडे वळल्याचं चित्र दिसतंय.


महत्त्वाच्या बातम्या:


Indian Dairy Festival In Kolhapur : कोल्हापुरात जानेवारीत इंडियन डेअरी फेस्टिव्हल; खासगी व सहकारी दूध डेअरीचे प्रतिनिधी सहभागी होणार