Wardha PSI Latest News: वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील (Wardha Police News) आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विवेक जानराव लोणकर याला 2 लाखांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आले आहे.  ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आरती चौकात असलेल्या नर्सरीच्या प्रवेशद्वारासमोर केली.


आरोपीची बेल रद्द न होण्याकरता तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीला आरोपी न करण्याकरिता तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे..


हिंगणघाट पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल :
वर्ध्याच्या हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक फसवणुकीचा गुन्हा होता.फसवणुकीची रक्कम 44 लाखांवर असल्याने हे प्रकरण हिंगणघाट पोलिस ठाण्यातून पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक विवेक लोणकर यांच्याकडे होता.
याप्रकरणात अकोला येथील रहिवासी असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर झाला होता. तक्रारदार तारखेवर हजरही राहत होता. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेतील  लाचखोर पोलीस उपनिरीक्षक लोणकर याने फसवणूकीतील आरोपीला दाखल गुन्ह्यात त्याच्या पत्नीला आरोपी न बनविण्यासाठी तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी तसेच जामीन रद्द न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यावर सातत्याने लोणकरकडून मानसिक दबाव निर्माण केला जात होता. 


सापळा रचून केली कारवाई:
 तक्रारदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून पोलिस अधीक्षक राहुल माखणीकर यांच्याकडे तक्रार केली. तक्रार दाखल होताच सापळा रचून प्रकरणी पहाटेच नागपुर येथील लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्जापुरे यांचे पथक वर्ध्यात दाखल झाले. आरती चौकातील नर्सरीसमोर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपी विवेक लोणकर याला फोन करुन बोलाविले. आरोपी लोणकर हा दुचाकीने नर्सरीच्या प्रवेशद्वाराजवळ आला. तेथून त्याने झाडेही विकत घेतली. तेवढ्यातच तक्रारदाराकडून लोणकरने दोन लाख रुपये घेत दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असतानाच त्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. या कारवाईत पोलिसांनी लोणकर यांची दुचाकीही जप्त केली आहे.


ही बातमी देखील वाचा


अमित शाहांसोबतच्या बैठकीत फेक ट्वीटची चर्चा, एकनाथ शिंदेंनी सवाल उपस्थित केला तर बोम्मई म्हणाले, 'ते ट्वीट माझं नाही'...