वर्धा : वर्धा जिल्ह्यातील (Wardha News) दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात पुतण्याने 45 वर्षीय काकुवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिला शेतात एकटी असल्याचं बघून नराधम आरोपीने हे कृत्य केलं आहे. वर्धा जिल्ह्यात घडत असलेल्या सततच्या अत्याचारांच्या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला असून या घटनेमुळे नराधमांना कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दहेगाव परिसरात घडलेली ही घटना अतिशय घृणास्पद असून महिलेने दहेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी पुतण्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
तोंड दाबून बळजबरी अत्याचार
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पीडित महिला ही घरच्या शेतात पराटी पिकाच्या निंदणासाठी गेली होती. तेव्हा महिलेचे लहान जावई सोबत होते. निंदण झाल्यावर जावई जेवण करण्यासाठी घरी गेले तेव्हा महिला शेतात एकटी होती. तिला एकटे बघून पुतण्या मागून आला आणि महिलेसोबत बळजबरी करू लागला, एवढंच नाही तर त्याने महिलेचे तोंड दाबून तिच्यावर जबरीने अत्याचार केला आणि आरोपी पळून गेला. पीडित महिलेच्या शेताला लागून तिच्या मोठ्या दिराचे शेत आहे. त्या शेतात तिला मोठे दीर बैल चारताना दिसले आणि तेव्हा त्यांना पीडित माहिलेने घडलेला प्रकार सांगितला. हा संतापजनक प्रकार ऐकून त्यांना देखील धक्काच बसला.
महिलेने दिली पोलिसांत तक्रार
पीडित माहिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचारानंतर थेट दहेगाव पोलीस ठाणे गाठले आणि तिच्या आरोपी पुतण्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. वर्धा जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे. आता शेतात काम करणाऱ्या या महिलेसोबत घडलेला प्रकार कानावर पडल्यावर अशा घटनांमुळे महिलांना असुरक्षित वाटत असल्याच्या प्रतिक्रिया महिला देत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे.