Wardha Crime News : वर्धा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली असून चक्क चोरट्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात दरोडा टाकत दागिने पळविले आहेत. एवढंच नाही, तर चोरट्यांने पोलिसाच्या लहान मुलीच्या गळ्याला चाकूसारखा तुकडा आणि पोटाजवळ लोखंडी सळाख लावत लुटलं आहे. वर्धा जिल्ह्यातील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन घरातील चिमुकलीला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील अंदाजे एक लाख 42 हजार रुपयांचे दागिने घेऊन धूम ठोकली. ही घटना सिंदी मेघे परिसरातील झाडे लेआऊट येथे मध्यरात्री घडली. या घटनेने वर्धा जिल्ह्यात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
ओरडायचे नाही, मुलीला चाकू आणि सळाख लावून दिली धमकी :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन छोटेलाल यादव हे रामनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. ते स्टेशन डायरीवर ड्यूटी होते. त्यामुळे ते सोमवारी 11 वाजता पोलीस ठाण्यात कर्तव्यावर गेले होते. घरात पवन यादव यांची पत्नी पूनम, दोन मुली आणी आई होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटा दारातून घरात शिरला. त्यानंतर पत्नी पूनम यांना आवाज करायचा नाही, "ओरडायचे नाही, तुमच्याकडे जे काही पैसे, सोनं असेल ते द्या" अशी धमकी दिली. तेवढ्यातच त्याने पवन यादव यांच्या लहान मुलीला उचलून तिच्या गळ्याला चाकूसारखा तुकडा आणि सळाख लावली आणि जे घरात आहे ते दे, नाहीतर "मुलीच्या पोटात टाकीन"अशीही धमकी दिली. घाबरलेल्या पूनम यादव यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन हार, सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याची चैन, सोन्याचा झुमका, सोन्याचे कानातले, सोन्याचे मंगळसूत्र, असे एकूण एक लाख 42 हजार रुपयांचे दागिने दरोडेखोरांच्या स्वाधीन केले.
चोरट्याने सोने घेऊन ठोकली धूम :
सोने मिळताच दरोडेखोराने चिमुकलीच्या गळ्याला लावलेला चाकू आणि सळख काढली आणि तिला मुक्त केलं. त्यानंतर लागलीच सोन्याचा ऐवज बॅगमध्ये भरत दुचाकीने पळाला. पूनम यादव यांनी घटनेची माहिती पती पवन यादव यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करुन अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. मात्र, जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसाच्याच घरी अशाप्रकारे दरोडा पडला हे ऐकून नागरिकांची झोप उडाली आहे. परिणामी सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.