Har Ghar Tiranga Campaign : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आता अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला असून देशभर त्याची धूम पाहायला मिळतेय. देशातल्या प्रत्येक घरावर यंदा तिरंगा फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र पॉलिस्टरच्या कापडापासून ध्वज निर्मिती करण्याच्या मान्यतेमुळे खादी उद्योगाला फटका बसला आहे. ध्वजसंहितानुसार राष्ट्रध्वज हे हाताने काढलेले किंवा विणलेल्या लोकर, सूत, शिल्क खादी कपड्यापासून बनवलेला असावा अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु केंद्र शासनाने या तरतुदीत बदल करून यात पॉलिस्टर कापडाचा समावेश केला आहे. यामुळे देशातील खादी उद्योगाला मोठा फटका बसला आहे परिणाम झाला आहे.
दरम्यान स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने मोहिम हाती घेतल्या आहेत. हर हर तिरंगा हे अभियान काही महिन्यापूर्वी राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात खादीला राष्ट्रध्वज तयार करणे शक्य नाही. मात्र वर्षापूर्वी ही मोहीम हाती घेतली असती तर याचा नक्कीच फायदा खादी ग्राम उद्योगाला झाला असता. 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात तब्बल साडेसात लाख तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहेत. या अभियानात राज्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 24 तास ग्रामीण, शहरी, कुटुंब शाळा शासकीय कार्यालयावर दीड कोटी राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. दरम्यान पॉलिस्टरच्या ध्वज निर्मितीच्या मान्यतेमुळे याचा फायदा खादी ग्राम उद्योगाला होणार नाही.
राष्ट्रध्वज तयार होणारी ठिकाणे
- नांदेड , मुंबई ,ग्वालियर , हुबळी
- राष्ट्रध्वजाचा आकार लांबी रुंदी ( फुटात)असते
- नागरिकांचे घर (ग्रामीण व शहरी) 2×3
- शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापना 4.5×3
राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या देशभरातील निवडक केंद्रांमध्ये समावेश असलेली नांदेड येथील ऐतिहासिक संस्था म्हणजे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी 1967 मध्ये स्थापन केलेल्या व त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी संगोपन केलेल्या या संस्थेचा कायापालट करण्याच्या निर्णय तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने घेतला. ज्यात तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने या वास्तूच्या कायापालट करण्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती हे केंद्र केवळ खादी उत्पादनांचे निर्मिती केंद्र नसून पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे स्थळ म्हणून ओळखले जाते.
नांदेड येथील खादी ग्रामोद्योग या समितीद्वारे निर्मिती करण्यात येणारा तिरंगा देशभरात पुरवठा केला जातो. मुंबईच्या मंत्रालयासह देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावरील फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अखंड देशभरात नांदेडहून राष्ट्रध्वज पाठवला जातो. देशात कर्नाटकमधील हुबळी जि. धारवाड व नांदेड या दोनच ठिकाणाहूनच देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठा होतो. नांदेड शहरात मराठवाडा खादी ग्रामउद्योग समितीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.ज्यात विविध दहा आकाराचे राष्ट्रध्वज येथे तयार केले जातात. सदरील राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून मागविले जाते. दरम्यान राष्ट्रध्वज निर्मिती करताना राष्ट्रध्वजाचा कपडा, शिलाई, स्वच्छता, आकार, सौंदर्य, रंग या सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. कापड, दोरी, लाकूड, शिवणकाम आदी बाबत बारकावे तपासूनच तिरंगा ध्वज पुढे पाठविला जातो. देशातील महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तेलंगणा, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, चंदिगढ, पॉंडेचरी यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यात नांदेड येथे निर्मिती केलेला तिरंगा ध्वज पाठविला जातो.
नांदेड येथील खादी ग्राम उद्योगात समितीत दिवसाला 40 राष्ट्रध्वज तयार केले जातात. या राष्ट्रध्वज निर्मिती समितीत शिलाई करण्यासाठी एकूण तीन कारागीर आहेत. तर निर्मिती झालेल्या ध्वजाची पॅकिंग करण्यासाठी दोन कर्मचारी आहेत. ज्यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. नांदेड येथील खादी ग्राम उद्योगात तयार झालेले ध्वज हे देशभरातील संस्था तथा शासकीय कार्यालयात वितरित होत असतात. तसेच मंत्रालयाच्या ठिकाणी लावणारे ध्वज सुद्धा याच ठिकाणी तयार होत असतात.
ध्वज फडकवण्याची नियम
- प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेचे पालन करावे
- तिरंगा ध्वज फडकवताना केशरी रंग वरच्या बाजूला असावा
- तिरंगा ध्वज काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा अभियान कालावधीनंतर दूध फेकला जाऊ नये तो सन्मानाने जतन करून ठेवावा.
- अर्ध झुकलेला फाटलेला कापलेला ध्वज कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये.