Wardha News : मृत्यूनंतर कुटुंबियांनी घरातच मृतदेह पुरल्याची घटना वर्धा (Wardha) जिल्ह्यात घडली आहे. सेवाग्राम (Sevagram) इथे एका 37 वर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी तिचा मृतदेह (Deadbody) घरातच पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मृत मुलगी मनोरुग्ण असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. सेवाग्राम इथल्या आदर्श नगर परिसरात ही घटना घडली. ज्या घरात हा मृतदेह गेल्या दहा दिवसांपासून पुरण्यात आला, त्या घराजवळ सायंकाळी बघ्यांची गर्दी जमली होती. मृत तरुणीचे नाव कुमारी प्रविणा साहेबराव भस्मे असं आहे.
...म्हणून गुपचूप मृतदेह घरातच पुरला!
सेवाग्राम इथे आदर्श गर इथे भस्मे कुटुंब राहते. या कुटुंबात आई, वडील, भाऊ आणि बहीण असे चार जण राहत होते. पण 37 वर्षीय प्रविणा साहेबराव भस्मे मनोरुग्ण होती. शिवाय तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. 3 जुलै रोजी रात्री सातेसात वाजता तिचा मृत्यू झाला. परंतु या परिसरात भस्मे कुटुंबातील व्यक्तीशी कोणीही बोलत नसल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय घरची आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची होती. त्यामुळे अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न कुटुंबियांसमोर होता. अखेर मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वडील साहेबराव आणि भाऊ प्रशांत यांनी शेजाऱ्यांना कोणतीही कुणकुण न लागू देता घरातच पहिल्या खोलीत चार ते पाच फूट खोल खड्डा खोदला आणि त्यात मुलीचा मृतदेह पुरला.
अधिकाऱ्यांसमोर मृतदेह बाहेर काढला
मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे घरात मृत्यू झाल्याची शंका शेजाऱ्यांना आली. या सर्व घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना 13 जुलैच्या दुपारी मिळाली. पोलिसांनी हलचाली करत भावाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. दहा दिवसांपूर्वीच राहत्या घरात मुलीचा मृतदेह पुरला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याची माहिती महसूल प्रशासनाला दिली. अखेर 13 जुलैच्या रात्री सात वाजता पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी बारसागळे, तलाठी गुलशन पटले, कर्मचारी तडस या महसूल अधिकाऱ्यांच्या टीमसमोर पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी सेवाग्राम रुग्णालयातील वैद्यकीय टीम आणि पोलीस प्रशासन यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा