Agriculture News : राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात पावसाची (Rain) प्रतीक्षा आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची (Farmers) शेतीची काम खोळंबली आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या करण्यासाठी पावासाची गरज आहे. तर काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्या पिकांना आता पावसाची गरज आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यात (Wardha) काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलं आहे. कुटकी परिसरात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. 


वर्धा जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडेच


शेतकऱ्यांची या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन या पिकावर भिस्त आहे. पण मृग नक्षत्राचा पाऊस वर्धा जिल्ह्यात बरसला नाही. त्यामुळे यावर्षी उशिरा होत असलेल्या पेरण्यामुळं उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 35 टक्के इतक्याच पेरण्या उरकल्या आहे. पण ज्या पेरण्या झाल्या त्या सुद्धा पावसाअभावी अपयशी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 


पेरणीनंतर उगवलेले बियाणे पावसाअभावी कोमेजले


खरंगणा गोडे आणि कुटकी तडोदी या भागात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करायला सुरुवात केली आहे. पेरणीनंतर उगवलेले बियाणे पावसाअभावी कोमेजले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कुटकी तळोदी परिसरातील शेतकरी राजेश विठ्ठल खडसे या शेतकऱ्याने कपाशीला मोड आल्याने दुसऱ्यांदा पेरणी केली आहे. 


पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता


सध्या राज्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पण शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये. जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. 


जून महिन्यात राज्यात कमी पाऊस


पावासाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी अद्याप अनेक ठिकाणी पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. सरासरीच्या उणे 46 टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचं बघायला मिळत आहे. दुसरीकडं, राज्यात जून महिन्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळं लांबलेला मान्सून दाखल होण्यास उशिर झाला. तेवढ्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात कमाल तापमानाची नोंद बघायला मिळाली. विदर्भात जून महिन्यातील 7 दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळाल्या. दरम्यान, या चालू जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण अनेक ठिकाणी पाऊस नसल्यामुळं शेतीचं कामं खोळंबली आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : राज्यात पावसाला सुरुवात, मात्र शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला