Dr Abhay Bang News: मराठी साहित्यिकांनी गांधींच्या स्वातंत्र्य संग्रामाची उपेक्षा केली. उपहास केला आणि उग्र विरोध केला आणि तरीही साधले नाही तेव्हा कोणीतरी गांधीचा खूनच करून टाकला, असं परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग म्हणाले. ही मराठी साहित्यिकांची मोठी मर्यादा आहे. कदाचित बहुतांशी लेखक हे ब्राह्मण होते आणि टिळकपंथी होते, म्हणून गांधी आपलासा वाटला नाही, जातीयता मध्ये आली आणि असे घडले असे मत डॉ अभय बंग म्हणाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत अभय बंग यांनी गेल्या शंभर वर्षातील मराठी साहित्य आणि साहित्यिकांवर जोरदार टीका करत गांधीविरोधी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन विचार करायची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ अभय बंग म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि तो वर्ध्यात होतोय. त्यामुळे तुम्ही मला संधी दिलेली आहे. मी आज दोन अतिशय गंभीर विधान साहित्याच्या बाबतीत करू इच्छितो. पहिला म्हणजे महात्मा गांधी हा एक विलक्षण महानायक 1920 ते 1947 च्या काळात होता.. त्या काळात एक महाभारत (स्वातंत्र्य संग्राम) भारतात घडलं. मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्याने याबद्दल न्याय केला का? मला असं वाटते वैचारिक क्षेत्रात केला गेला. मात्र, ललित साहित्यात याबद्दल दुर्दैवाने वाळवंटच आढळतं. काही तुरळक अपवाद सोडता येते. मात्र बहुतांश मराठी साहित्य आणि मराठी साहित्यिक हे स्वातंत्र्य युद्ध आणि गांधी विचार व गांधींसारख्या महानायकापासून अलिप्तच राहिले. का राहिले हा प्रश्नच आहे.. एवढं मोठं महाभारत इथं घडत होतं. ज्या महाभारतात ब्रिटिश आणि भारतीय असे दोन पक्ष होते. त्यात लाखो लोक भाग घेत होते. महाभारतासारखेच अनेक योद्धेही होते, प्रत्येकाच्या आपापल्या मर्यादाही होत्या. यापेक्षा चांगला कॅनव्हास मराठी ललित लेखकांना मिळूच शकत नाही. फ्रेंच राज्यक्रांतीवर, रशियन क्रांतीवर तिथल्या लेखकांनी अप्रतिम लिखाण केले. मात्र मराठीमध्ये असं काहीही झालं नाही, असं डॉ अभय बंग म्हणाले.
डॉ अभय बंग म्हणाले की, मराठीत शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर सुंदर लोकप्रिय कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. मात्र, हा जिवंत इतिहास जो गेल्या शतकामध्ये मराठी साहित्यिकांच्या अंगणात, दारात आणि घराघरात घडला.. त्यासंदर्भात बहुतांशी मराठी साहित्यिक केवळ दूरच राहिले नाहीत तर त्यांनी त्याची उपेक्षा केली, उपहास केला आणि उग्र विरोधही केला. आणि तरीही साधले नाही, तरी कोणीतरी गांधीचा खूनच करून टाकला. ही मराठी साहित्यिकांची मोठी मर्यादा आहे.. या महाभारतातून एखादं महाकाव्य लिहावं, एखादी महाकादंबरी घडावी असं काहीही घडलं नाही. उलट दुर्दैवाने मी नथूराम गोडसे बोलतोय असा कालकूट विषय निघाला.
डॉ. बंग म्हणाले की, मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन शांतपणे विचार करायला पाहिजे की असे का घडले. आमचा संकुचित प्रांतवाद मध्ये आला की गांधी मराठी नव्हता, असे घडले की आमची जातीयता मध्ये आली. कदाचित बहुतांशी लेखक हे ब्राह्मण होते आणि टिळकपंथी होते, गांधी आम्हाला आपलासा वाटला नाही आणि असे घडले, डॉ अभय बंग म्हणाले.
डॉ. बंग म्हणाले की, जो स्वातंत्र्य संग्राम लोकांच्या जीवनात प्रकट झाला.. ज्याच्यातून काँग्रेस सारखा राजकीय पक्ष समोर आला आणि सत्तेत गेला. साहित्यामध्ये हे सर्व का येऊ शकलं नाही. मला आजही वाटते की हा विषय मराठी साहित्यिकांसाठी एक मोठं आव्हान आहे.. हे महाभारत त्यांची वाट पाहत आहे, असं डॉ अभय बंग म्हणाले.
ही बातमी देखील वाचा