Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वर्धा (Wardha) येथे सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीही आचार्य विनोबा भावे या मुख्य सभागृहासह इतर सभागृहात अत्यंत कमी संख्येने प्रेक्षक आणि श्रोते पाहायला मिळत आहेत. काल संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण सुरू असताना सुद्धा मुख्य सभागृहात 90% खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसऱ्या दिवशीही फारशी स्थिती बदललेली नाही. त्यामुळे साहित्य संमेलन सरकारी अनुदानावर चालणारी सहल बनले आहे का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
आज सकाळच्या सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांच्या प्रकट मुलाखतीच्या वेळी काही प्रमाणात प्रेक्षक सभागृहात उपस्थित होते. मात्र दुपारच्या सत्रात कृषी विषयक आणि इतर विषयांवरील चर्चासत्राच्या वेळेला बोटावर मोजणे इतकेच प्रेक्षक सभागृहात पाहायला मिळाले. त्यामुळे यापूर्वीच्या साहित्य संमेलनांच्या तुलनेत वर्ध्यातील या साहित्य संमेलनाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याचा चित्र आहे. काहींना या मध्ये आयोजकांची चूक वाटत असून आयोजकांनी विविध चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवादाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याचे वाटत आहे. तर काहींना साहित्य संमेलन अनेकांसाठी सरकारी पैशावरील सहल झाल्याचे वाटत आहे.
सरकारी अनुदानावर चालणाऱ्या या संमेलनात अनेक कथित लेखक संमेलन असलेल्या शहरात पोहोचतात. मात्र संमेलनात उपस्थिती लावण्याऐवजी आजूबाजूचे प्रेक्षणीय व पर्यटन स्थळांना भेटी देतात असे आरोपही काहींनी केले आहेत. तर काहींनी अशा संमेलनांना आता सरकारी अनुदान द्यावं की नाही यावर पुनर्विचार करण्याची मागणी ही केली आहे. मुंबई, पुणे आणि इतर लांबच्या ठिकाणातून आलेल्या अनेक रसिकांनी इथल्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत निराशा जाहीर केली आहे.
दिवसभर रिकामे असलं तरी सायंकाळच्या सुमारास मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं दिसून आलं. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे, किशोर कदम, लेखक अरविंद जगताप यांची मुलाखत बालाजी सुतार यांनी घेतली.
स्टॉल्सचा खर्चही निघेना, ग्रंथ विक्रेत्यांना फटका!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादाचा फटका ग्रंथ विक्रेते आणि प्रकाशकांनाही बसत आहे. एका स्टॉल साठी 7000 याप्रमाणे हजारो रुपये खर्चून, पुस्तक आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करून विक्रेत्यांनी आपल्या पुस्तक विक्रीचे स्टॉल्स लावले आहे. मात्र कालपासून वाचकांची उपस्थिती अत्यल्प असल्यामुळे फारशी पुस्तक विक्री होऊ शकत नाही आहे. त्यावर वर्ध्यातील तीव्र उन्हाने पुस्तक विक्रीवर विपरीत परिणाम केले आहे. कालचा तुलनेत आज काही अंशी ग्राहक पुस्तक खरेदीसाठी आले असले, तरी यापूर्वीच्या साहित्य संमेलनाच्या तुलनेत पुस्तक खरेदीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
रविवारी गर्दी राहणार असल्याची अपेक्षा
जे लोक साहित्य संमेलनात नियमितपणे उपस्थित राहतात अशांच्या मते यंदाच्या साहित्य संमेलनात लोकांची उपस्थिती नगण्य आहे. तर काहींना वाचन संस्कृती रोडावत चालल्यामुळे असे होत असल्याचे वाटत आहे. तरुण पिढी, लहान मुलं पुस्तक वाचायला तयारच नाहीत. त्यांना मोबाईलच्या रिल्समध्ये जास्त रस असून वाचनही ते डिजिटल करणे पसंत करत असल्याची भावना काही पालकांनी व्यक्त केली. तर विद्यार्थ्यांना पुस्तक वाचायला लावण्यासाठी आधी मला ती पुस्तक खरेदी करावी लागते, वाचावी लागते आणि मग त्याची कथा विद्यार्थ्यांना सांगितल्यावर ते ती पुस्तक वाचतात अशी व्यथा एका शिक्षकाने बोलून दाखविली. उद्या रविवार असून वर्धा सह नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जवळपासच्या जिल्ह्यातून वाचकांनी साहित्य संमेलनात हजेरी लावावी अशी अपेक्षा अनेक पुस्तक विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
ही बातमी देखील वाचा...