Wardha News : वर्ध्याच्या (Wardha) आर्वी आणि आष्टी तालुक्यात अनेक शेत शिवारातील वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून खंडित झाला आहे. महावितरणकडे (Mahavitaran) विनंत्या करुनही प्रश्न सुटला नसल्याने शेतकरी चक्क रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी आष्टी नजीकच्या आनंदवाडी - भारसवाडा या रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले आहे.


गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. शेतातील पिकं करपत चालली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही. महावितरण कर्मचाऱ्यांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चक्क रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको करुन लक्ष वेधले आहे.


पावसाची दडी, शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर


गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. मात्र, दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं  विहीर आणि बोरवेलची पाणी पातळी खालवली आहे. अशातच महावितरणकडून लोड शेडिंग सुरु करण्यात आलं आहे.  अपूर्ण होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळं शेतकऱ्यांना उपलब्ध असलेलं पाणीही पिकांना देता येत नाही. ग्रामीण भागात शेतीसाठी अवघा आठ तास विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून केला जात असतो. मात्र, त्यातही तो व्यवस्थित मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवघ्या दोन ते चार तास विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून केला जात आहे. अनियमित विद्युत पुरवठ्यामुळं पाणी असूनही अनेक शेतकरी पिकांना वाचवू शकत नसल्याची स्थिती आली आहे.


विजेची मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण


राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट पाहायला मिळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पडलेला पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी याचा फटका आता राज्याला बसत आहे. लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा फटका बसणार असून, मागणी वाढल्यानं आणि तुटवडा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळं राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी आता रोज लोड शेडिंगला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण एकीकडं पाऊस नाही, तर दुसरीकडं महावितरणकडून लोड शेडिंग सुरु आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Load Shedding : महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा; मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग