Raju Shetti : अप्पर वर्धा (Wardha) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काल (29 ऑगस्ट) आक्रमक भूमिका घेत मंत्रालयात आंदोलन केलं. मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या घेत जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय. राज्यकर्त्यांनो तुम्हाला पन्नास खोके मिळाले पण माझ्या धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यावा मोबदला कधी मिळणार? असा खडा सवाल शेट्टींनी उपस्थित केलाय. 


नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी


राज्यातील अनेक धरणासाठी आणि प्रकल्पासाठी 1973 पासून जमीनी संपादित केल्या, प्रकल्पही पुर्ण झाले. अनेक मंत्री, ठेकेदार, लोकप्रतिनिधिंनी याच प्रकल्पातून भ्रष्ट्राचार करत हजारो कोटीची संपत्ती गोळा केली. पण ज्यांच्या जमीनीवर हे प्रकल्प झाले त्या दोन पिढ्या गेल्या तरी त्या शेतकऱ्यांना आजही मोबदल्यासाठी मंत्रालयात येवून जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.


अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका


अप्पर वर्धा (Wardha) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या घेत जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आम्ही अनेक दिवसांपासून निवदेन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, यावेळी मंत्रालयामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. अप्पर वर्धा प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. गेले अनेक दिवस हे शेतकरी त्याचं निवेदन घेऊन मंत्रालयात येत होते, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, असं आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जर याबाबत काही चर्चा केली नाही, तर आम्ही आत्महत्या करु असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे. 


प्रकल्पग्रस्तांना अद्यापही मोबदला मिळाला नाही 


मागील 103 दिवसांपासून हे शेतकरी मागण्यात करत असल्याचं म्हटलं जात आहे. अप्पर वर्धा प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या सरकारला दिल्या आहेत. पण त्याबदल्यात शासनाकडून मिळणारी हक्काच्या मोबादल्याची रक्कम अजूनही मिळाली नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं असून त्यासाठी ही आक्रमक भूमिका घेतली असल्याचं सांगण्यात आलं आहे. , 


महत्त्वाच्या बातम्या:


Farmer Protest : मंत्रालयात शेतकऱ्यांचे आंदोलन, अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन