Wardha sahitya sammelan 2023 : वर्ध्यात होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला आता वेग आला आहे. निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, सभामंडप, ग्रंथ दालन, सभामंडप, जनजागृती आणि पार्किंग सुविधांसाठी विविध 42 समित्या कार्य करत आहेत. वर्ध्यात सभामंडप उभारणी सुरू आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी महात्मा गांधी साहित्य नगरी सज्ज झाली आहे. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानावर साहित्य संमेलन होणार आहे. दरम्यान,  1969 मध्ये स्वावलंबी शाळेच्या प्रांगणात 48 वे साहित्य संमेलन  झाले होते.


साहित्य संमेलनाचा निधी रखडला -


96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या 9 दिवसावर आले असताना अद्याप शासनाचा ठरलेला निधी साहित्य संमेलनाच्या नियोजन समिती पर्यत पोहचला नसल्याची चिंता साहित्यिकांमध्ये होती, पण  काही वेळापूर्वी ठरलेला 50 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झालाय. याशिवाय साहित्य संमेलनाच्या निधीची रक्कम वाढवून ती 2 कोटी रुपये करण्यात आली होती, तशी घोषणा देखील मराठी भाषा मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. पण अवघ्या 9 दिवसावर साहित्य संमेलन आले असताना अजून वाढीव निधी प्राप्त झाला नाही. जो नियमित 50 लाख रूपयांचा निधी मिळतो तो मंजूर झालाय पण निधी मिळायला तीन दिवस लागतील अशीच प्रतिक्रिया संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली होती. तो निधी आता प्राप्त झाला असल्याची माहिती येतेय.



- भव्य ग्रंथ दालन ठरणार आकर्षण


वर्ध्यात होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू आहे. पाच सभामंडप येथे उभारले जात आहे.  वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी महात्मा गांधी साहित्य नगरी सज्ज झाली आहे. येथूनच चारशे मीटर अंतरावर स्वावलंबी शाळेचे प्रांगण आहे, या प्रांगणात 1969 मध्ये 48 वे साहित्य संमेलन पार पडले होते. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर सुरू असलेल्या तयारीत टीम वर्क केले जात आहे, हेच जाणून घेण्यासाठी सभामंडप, ग्रंथदालन व मैदानावरील नियोजनात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या उपअभियंता व सभामंडप समन्वयक महेश मोकलकर यांच्याशी आमचे  प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी बातचीत केली आहे.  महेश मोकलकर यांनी साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत माहिती दिली. 



अति महत्वाच्या व्यक्तींसाठी भोजन व्यवस्थेत बदल


वर्ध्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या भोजन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अति महत्वाच्या व्यक्तींसाठी मुख्य सभांडपाशेजारीच ही भोजन व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वर्ध्यात होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हजेरी लावण्याची शक्यता आहे. पोलीस विभागाने भोजन स्थळ व इतर व्यवस्थेची पाहणी केली. दरम्यान व्ही आय पी साठी असणारे भोजन स्थळ व सभामंडप यातील अंतर पाहता सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे समोर आले.  अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेत व्ही व्ही आय पी साठी असणारे भोजनस्थळ मुख्य सभामंडपाशेजारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'व्हीव्हीआयपी'साठी या मुख्य सभामंडपाशेजारी चहापान व भोजनव्यवस्था असणार आहे. तर 'व्हीआयपी'साठी असणारे भोजन स्थळ मात्र स्वावलंबी या विद्यालयातच असणार आहे.