Latur News :  लातूर (Latur) जिल्ह्यातील तळेगाव (Talegaon) हे 150 उंबऱ्याचे गाव आहे. या गावातील सर्वजण शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, या गावातील 75 टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने (Waqf Board) दावा केला आहे. गावातील 103 शेतकऱ्यांचा 300 एकर जमिनीचा यात समावेश आहे. यामुळं आता अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे आता वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. 


राज्य शासनाच्या वक्फ न्यायाधीकारण्यात याचिकाकर्ते पटेल सय्यद इरफान याच्या अर्जावरून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास 103 शेतकरी व महाराष्ट्र शासन यांना 30 मे रोजी नोटीस बजावण्यात आल्या. एकाच वेळी 103 शेतकऱ्यांना नोटीस आल्याने अनेकांनी वकिला मार्फत आपले म्हणणे सादर केले आहे. यावर आता 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे आता वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. 


तळेगावच्या 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिका क्रमांक 17/ 2024 अन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिसींमध्ये वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा आल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नोटिसला उत्तर देण्याचं ठरवलं आहे. वकिलांमार्फत उत्तरही दिलं आहे. मागील तीन ते चार पिढ्यापासून आमच्या ताब्यात असलेली ही जमीन आता परत जाईल या भीतीने गावातील अनेक शेतकरी दहशतीत आहेत.


लातूर जिल्ह्यातील कुठल्याही जमिनीवर आमचा दावा नाही- समीर काजी


दरम्यान, अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मतानुसार, तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या जवळपास 300 एकर जमिनी प्रकरणी शेतकर्‍यांना व न्यायाधीकारणाच्या नोटीसी आल्या आहेत. याची संपूर्ण माहिती घेऊन शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात येणार आहे. 


तर दुसरीकडे राज्यातील वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काजी यांच्या माहितीनुसार तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस या एका व्यक्तीने कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत. त्या नोटीस वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत. अशी स्पष्टोक्ती ही महाराष्ट्र वक्फ बोर्डाने आता दिली आहे. तसेच आम्ही लातूर जिल्ह्यातील कुठल्याही जमिनीवर दावा केलेला नाही. असेही समीर काजी म्हणाले. 


हे ही वाचा