Mohammed Shami Syed Mushtaq Ali Trophy 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड पिंक बॉल कसोटीत अवघ्या 3 दिवसांत टीम इंडियाने शरणागती पत्करली. त्यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. रोहित शर्मा म्हणाला होता की, त्याच्यासाठी संघाचे दरवाजे नेहमी उघडे आहे. दरम्यान रोहितचा हा मेसेज मोहम्मद शमीपर्यंत पोहचला आहे, कारण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या पहिल्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये शमीने स्फोटक फलंदाजी केली.  






भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फॉर्मात आहे. त्याने अनेक वेळा गोलंदाजीत उत्कृष्टता दाखवली आहे. आता शमीने फलंदाजीतही ताकद दाखवली आहे. बंगालकडून त्याने नाबाद 32 धावा केल्या. यादरम्यान त्याने षटकार आणि चौकारचा पाऊस पाडला. शमीच्या खेळीच्या जोरावर बंगालने चंदीगडला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य दिले आहे.


बंगालचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला. चंदीगडविरुद्धच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने 20 षटकांत 9 गडी गमावून 159 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर करण लालने 33 धावा केल्या. करणने 1 चौकार आणि 2 षटकार मारले. हृतिक चॅटर्जीने 12 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 3 षटकार आणि 2 चौकार मारले. 






शमीने शेवटच्या षटकात पाडला धावांचा पाऊस


बंगालसाठी शमी दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान शमीने 17 चेंडूंचा सामना करत नाबाद 32 धावा केल्या. शमीच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात त्याने 18 धावा काढल्या. संदीप शर्माच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शमीने षटकार ठोकला होता. यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा आणि पुन्हा पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. शमीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. अशा प्रकारे शेवटच्या षटकात 18 धावा ठोकल्या.


बंगालने जिंकले सलग तीन सामने


बंगालने उपांत्यपूर्व फेरीपूर्वी सलग तीन सामने जिंकले होते. त्याने राजस्थानचा 7 विकेट्सने पराभव केला. तर बिहारचा 9 गडी राखून पराभव झाला. तर मेघालयचा 6 गडी राखून पराभव झाला.


मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला जाणार?


जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाही. शमी ऑस्ट्रेलियात त्याच्यासोबत राहिला असता तर भारतीय गोलंदाजी अजून घातक झाली असती. याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी शमी शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात सामील होऊ शकतो, असे मानले जात आहे. 


हे ही वाचा - 


WTC पॉइंट टेबलमध्ये पुन्हा उलथापालथ! तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडिया टॉप-2 मध्ये मारणार एन्ट्री, जाणून घ्या नवीन समीकरण काय?


Rohit Sharma : कॅप्टन रोहितला मिळणार नारळ? अचंबित करणारी आकडेवारी आली समोर; BCCI लाही आलं टेन्शन!