मुंबई: देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षांपूर्वी 'मी पुन्हा येईन' म्हणाले होते. पण ते पुन्हा आलेच नाहीत, दुसरीकडे बसले. मात्र, या पाच वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांच्यात काय बदल झाले, हे मगाशी त्यांच्या भाषणातून दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांच्यात एक आमुलाग्र बदल घडलाय. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आताच्या आपल्या भाषणातून विरोधी पक्षासोबत पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या या कृतीचे स्वागत करतो, असे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून मला जी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, विरोधी पक्षाशी संवाद साधण्याची त्यांना असलेली अपेक्षा. त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, आज ते पु्न्हा ताकदीने सभागृहात येऊन बसले आहेत. त्यासाठी त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत भाषण केले.


विरोधी पक्ष हा किती मोठा किंवा लहान आहे यापेक्षा तो जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याचे काम करत असतो. दादांनी आपल्या भाषणात काही मुद्दे मांडले. आम्ही तुम्हाला चॅलेंज करतच नाही, तुमची संख्या जास्तच आहे. तुमच्याकडे 237 आमदारांचे संख्याबळ आहे. आता तु्म्ही तिघांनी मन एवढं मोठं केलं पाहिजे की,  आपल्या बाजूने 237 नव्हे तर 288 जणांचं सभागृह आहे, असे मानले पाहिजे. आम्ही यापूर्वी सभागृह आणि निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन तुम्हाला लक्ष्य केले. पण जनतेने त्यानंतर निकाल दिला आहे. त्यामुळे आता तु्म्ही सरकार चांगल्या पद्धतीने चालवाल, अशी अपेक्षा मी करतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 


पहिल्यापेक्षा दुसरंच भाषण मुख्यमंत्र्यांचं वाटत होतं, एकनाथ शिंदेंच्या टोलेबाजीनंतर जयंत पाटलांची मिश्कील टिप्पणी


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यावर जयंत पाटील यांनी टिप्पणी करताना म्हटले की, आज सभागृहात तीन भाषणं झाली. पण पहिल्या भाषणापेक्षा दुसरंच भाषण मुख्यमंत्र्यांचं आहे की काय, असे वाटत होते. त्यामधून सभागृहाला प्रदीर्घ मार्गदर्शन झाले, असे जयंत पाटील यांनी म्हटले.


राहुल नार्वेकरांना मंत्री होण्याचा सल्ला दिला होता, पण... जयंत पाटील काय म्हणाले?


राहुल नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. मी तुम्हाला खासगीत सांगायचो, परत संधी मिळाली की, मंत्री व्हा. तु्म्ही मंत्री झालात तर जास्त चांगलं होईल, असा सल्ला मी दिला होता. पण शेवटी आपल्या पक्षाचा निर्णय आहे, त्याबाबत मला खोलात जायचे नाही. तुम्ही अलीकडच्या काळात सासऱ्यांचं किती ऐकता, हे मला चांगलंच कळायला लागलं आहे. तुम्ही गेल्या अडीच वर्षात विधानसभा अध्यक्ष असताना वाद घालण्यासाठी आलेल्यांना गरम कॉफी देऊन पुन्हा घालवले आहे. त्यांना मासे आणि जेवणही खाऊ घातले आहेत. तुमच्या काळात बिझनेस अॅडव्हाजयरीच्या ज्या बैठका व्हायच्या, त्याचा दर्जा बाकीच्या व्यवस्था असल्याने एवढा उंच गेला की, आपणच अध्यक्ष राहावं, अशी आमची तेव्हापासूनची मनोमन इच्छा होती. पण तुम्हाला पुन्हा विधानसभा अध्यक्ष व्हायची इच्छा नव्हती. पण पक्षाने आदेश दिल्याने तुम्ही विधानसभा अध्यक्ष झालात, असे जयंत पाटील यांनी म्हटले. 


राहुल नार्वेकरांनी असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टही अजून त्यावर विचार करतंय: जयंत पाटील


जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षाच्या वादाबाबत भाष्य केले. राहुल नार्वेकर यांना या प्रकरणांमध्ये न्यायदानाचे काम करावे लागले. त्यावेळी नार्वेकरांकडून आम्हाला सहकार्य झाले. त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. विधानसभा सभागृहात साक्ष देताना आम्ही जे बोलायचो तेव्हा ते दुरुस्ती करायलाही मदत करायचे. त्यांनी अत्यंत संयमीपणे काम केले. राहुल नार्वेकर यांनी असा निकाल दिला की, सुप्रीम कोर्टाला अजून त्यावर निकाल देता आलेला नाही. सुप्रीम कोर्ट अजूनही नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर विचार करत आहे, या सगळ्यात एक सरन्यायाधीश घरी गेले. मला एकच गोष्ट आवडली,  ती म्हणजे तुम्ही कोणालाही अपात्र ठरवले नाही. त्याबद्दल आभार, असे जयंत पाटील यांनी म्हटले. 



आणखी वाचा


एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले