परभणी : पावसाळा सुरु झाला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु होते. मात्र अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला समोरं जावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.


किमान 100 मिली पावसानंतरच पेरणी योग्य

मान्सूनपूर्व पावसानंतरच शेतकरी खरीपाच्या तयारीला लागलाय. काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला देखील सुरुवात केली आहे. त्यात येणाऱ्या काळात पावसाने उघड दिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी सुरु करु नये, किमान शंभर मिली पाऊस झाल्यावर पेरणीला सुरवात करावी, असा सल्ला विद्यापीठातील शास्त्रज्ञ उद्धवराव आळसे यांनी दिला.

पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?

शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करताना जमिनीतील ओलावा किती आहे हे पाहावं, नंतरच सुरवात करावी, वाणाची निवड करुन प्रत्यक्ष पेरणी करताना बियाणे दोन ते तीन सेंमीपेक्षा जास्त खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणी अधिक खोल गेल्यास पाऊस जोराचा आला तर त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर पेरणी करताना पिकांची निवड आणि पेरणीचा काळ याचंही नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये कमी काळाची पिके सुरवातीला पेरली गेली पाहिजेत. यात मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आहे, तर दीर्घकालीन पिकांमध्ये कापूस, तूर अशी पिके आहेत. ती थोडी उशिरा पेरली तरी चालू शकतात, असंही कृषीतज्ञ सांगतात.

जमिनीनुसार पिकांची निवड

पेरणी करताना भारी जमिनीमध्ये दीर्घकालीन आणि कमी कालावधीची पिके घेता येतात. त्यामुळे आपल्याला दुबार पीक घेता येतं. यामध्ये मूग, उडीद पिके घेतल्यास रब्बी हंगामात ज्वारीसारखे पिके घेता येतात. तर हलक्‍या जमिनीमध्ये कारळ, तीळ, मटकी, हुलगे अशा प्रकारची पिके घेतल्यास पाणी कमी लागतं. त्यामुळे जमिनीनुसार योग्य त्या पिकांचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.

पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन केल्यास त्याचा पुढील अनेक दिवस फायदा मिळू शकतो. त्यासाठी योग्य ते नियोजन करत मशागत आणि पेरणी गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रकारानुसार उताराला आडवी पेरणी करावी, तर सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी यातून पडणारं पाणी शेतात मुरायला मदत होते, असा सल्ला कृषीतज्ञांनी दिला आहे.

वान निवडताना कोणती काळजी घ्याल?

वानांची निवड करताना जमिनीचा प्रकार आणि पाऊस पाणी यांचा विचार करुनच योग्य ते बियाणे खरेदी करावेत. यात कमी कालावधीत आणि मध्यम येणारे बियाणे बाजारात आहेत. योग्य ते मार्गदर्शन घेऊन बियाण्याची निवड केल्यास त्याचा फायदा होतो. पावसाच्या पर्जन्यमानानुसार वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळू शकतो, त्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची बियाणी उपलब्ध आहेत.

शेतकऱ्यांनी कृषीतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पेरणी आणि पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन, सोबत जमिनीची निवड आणि बियाण्यांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.