पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गायकवाड यांनी 55 टक्के गुण मिळवले.
26 वर्षीय ममता गायकवाड विवाहित आहे. त्यांनी लग्नापूर्वीच्या नावाने म्हणजे ममता पवार या नावे ही परीक्षा दिली होती. त्यांना 55 टक्के गुण मिळाले आहेत. मराठीत 38, हिंदीत 39 गुण असले तरी स्थायी समितीचा कारभार सांभाळताना उपयोगी पडणाऱ्या गणितामध्ये त्यांनी 59 गुण मिळवले.
2017 च्या महापालिका निवडणुकीत महिला आरक्षण पडल्यामुळे पती आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पत्नीला पहिल्यांदाच रिंगणात उतवरलं. त्यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. विनायक यांनी स्थायीच्या खुर्चीवर बसण्याचा चंग बांधला होता. पण पत्नीचे शिक्षण आठवीच्या पुढे न झाल्यामुळे त्यांनी सतरा नंबर फॉर्म भरुन दहावीची थेट परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
परीक्षेचं वेळापत्रक आलं. दुसरीकडे मार्च महिन्यात स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया सुरु झाली. यात पक्षाने ममता यांचं नाव पुढं केलं. इतर तीन सदस्यांमध्ये अध्यक्षपदाची चुरस लागली आणि त्या तिघांची नावं डावलत ममता यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली.
सात मार्चला त्यांनी शहराच्या चाव्या हाती घेतल्या आणि दुसरीकडे परीक्षांचं बिगुल वाजलं होतं. परीक्षा पार पडली आणि निकाल हाती आले.
पंचावन्न टक्के गुण मिळाल्याचं पाहताच त्यांचा जीव भांड्यात पडला. निकालावर एक नजर टाकली तर मराठी 38, हिंदी 39 या भाषेत त्यांना कमी गुण मिळालेत मात्र गणित विषयात 59 गुण आहेत. हे 'गुण' पाहता स्थायी समितीमधील 'आर्थिक गणितं' त्या व्यवस्थित हाताळतील हे नक्की.