Crime News: विरार (Virar) पश्चिमेच्या अर्नाळा परिसरात लग्न घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यात 25 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोख रक्कम आणि आहेरात आलेली पाकिटंही चोरट्यांनी लंपास केली आहेत. अर्नाळा येथील तुरुकुली वाडीतील दामोदर निवासमध्ये राहणाऱ्या भोईर कुटुंबीयांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली आहे. बुधवारी (4 मे) हा सर्व प्रकार घडला.


या प्रसंगानंतर परिसरात एकच खळबळ पसरली. सोनं, पैसे, आहेराची पाकिटं यासह कपाटातील महत्त्वाची कागदपत्रं घेऊन चोरटे फरार झाले आहेत. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्नाळा (Arnala) पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.  


रुकुली वाडीतील दामोदर निवासमध्ये 3 मे रोजी आशा भोईर यांच्या लहान मुलीचं लग्न पार पडलं. दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी संपूर्ण कुटूंब आणि परिवार विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथील सोसायटी बस स्टॉप येथे मुलाच्या घरी गेले होते. याचाच फायदा घेत घरी कुणी नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्यांनी 4 मे रोजी रात्री 8:30 ते 10 च्या दरम्यान घराच्या बाहेरील भिंतीवर चढून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट उघडून सर्व सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लग्नात आलेली बंद पाकिटं आणि महत्वाचे कागदपत्रे घेतले आणि घरी कोणी यायच्या आधीच चोर फरार झाले.


लग्न घरात चोरी झाल्याने संपूर्ण परिसरात दहशद निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारानंतर भोईर कुटुंबावर मोठ संकट आलं आहे. आधीच लग्नाचा खर्च आणि त्यानंतर दागिने आणि पैशांची चोरी झाल्याने भोईर कुटुंबापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पोलीस काही मार्ग काढू शकतील का, याकडे भोईर कुटुंबाच्या नजरा आहेत.


मुंबईतही काही दिवसांपूर्वी घडला होता असाच प्रकार


मुंबईतील गावदेवी परिसरातील एका घरातून तब्बल 1.98 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. चोरी झालेल्या दागिन्यांपैकी 1.71 कोटी रुपयांचे दागिने गावदेवी पोलिसांनी परत मिळवले होते. या चोरीमध्ये अनेक वर्षे घरात काम करणाऱ्या मोलकरणीचा समावेश होता. 


घरातील मोलकरणीला बेड्या आणि चोरी उघड


चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गावदेवी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करुन तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. चौकशीत मिलेन सुरेन या मोलकरणीनेच चोरी केल्याचं समोर आलं आणि तिला ताब्यात घेतलं. तिला अटक करुन चौकशी केली असता तिने याबाबत इत्यंभूत माहिती सांगितली आणि त्यावरुन यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.


हेही वाचा:


धक्कादायक! डोक्यात संशयाचं भूत घुसला, म्हणून कुऱ्हाडीने वार करून थेट पत्नीचा जीवच घेतला