Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची (Chili) लावण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावात सद्या शेतकरी मिरची लागवड करण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी मिरचीतून मिळत असलेले लाखोच्या उत्पन्नामुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकरी मिरचीने सुखी व समृद्ध झाले आहेत. सध्या अजिंठा, आनाड, बाळापूर, पिंपळदरी, गोळेगांव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोधवड, खंडाळा, वसई, अंभई, उडणगाव, आदी भागांतील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळत आहे.
सिल्लोड परिसरात दरवर्षी शेतकरी मोठ्याप्रमाणावर मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिलअखेर व मे महिन्यात लागवड करतात. या पिकासाठी शेतकऱ्यांकडून पाणी राखून ठेवले जाते. तर या वर्षी अधिक पर्जन्यमानाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा अधिकचा भर आहे. मागील वर्षी या परिसरात जवळपास सहा ते सात हजार हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली होती. तर यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे.
मल्चिंग पेपरच्या वापरावर भर...
मिरची लागवड करताना सध्या शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मल्चिंग पेपरच्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होत आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो.
पारंपरिक पिकांना फाटा देत मिरची लागवड
यावर्षी कापूस, सोयाबीन, सुर्यफुल पिकांना योग्य भावा मिळाला नाही. अशा परिस्थितीतही सिल्लोड परिसरातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन कायम ठेवले आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत मिरची लागवडीकडे दरवर्षी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिरचीतून निघत आहे. मागील वर्षी अतिपावसामुळे मिरची पीक खराब झाले होते. त्यामुळे मिरचीतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. यंदा मात्र मागील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी मिरची लागवडीचे जोरात नियोजन करीत असून, परिसरात विविध रोपवाटिकेतून विविध कंपनीची रोपे बुक करण्यात येत आहे.
एका एकराला 40 ते 45 हजार रुपये खर्च लागतो.
जुन महिन्यात मिरची विक्रीसाठी सुरू होते. मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची लागवड केल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. नांगरणी रोटावेटर पासून तर मिरची निघेपर्यंत एका एकराला 40 ते 45 हजार रुपये खर्च लागतो. पाण्याची कमतरता लक्षात घेत अनेक शेतकरी विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यावर मिरचीची लागवड करतात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात मिरचीला पाणी द्यावे लागते. तर ऊन जास्त असल्यामुळे मिरची पिकावर थ्रिप्स आजार येण्याची शक्यता असते. त्यामुळे औषधीची फवारणी करावे लागते. त्यामुळे एकूण मिरची पिकासाठी खर्चे मोठा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: