मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना आता त्यावर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी लागेल हे सध्या सांगणं अवघड असलं तरी मात्र सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश, घटनापिठातील निवृत्त होणार असल्याने निकाल लवकर लागेल ही अपेक्षा आहे. असंउज्वल निकम यांनी सांगितलं आहे. ते आज नाशिमध्ये बोलत होते.
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार अशी बातमी एबीपी माझाने या आधीच प्रकाशित केली होती. त्यानंतर आता उज्वल निकम यांनी हे वक्तव्य केलं आहे.
उज्वल निकम म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागेल हे सध्या तरी सांगणे कठिण असलं तरी तो लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ज्या घटनापीठासमोर सुरू होती त्या घटनापीठातील काही न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. ही सुनावणी पूर्ण झाली असून आता त्यावर निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची अपेक्षा आहे.
राजकारणात येण्याचा विचार नाही...
राजकारणात येणार का असं उज्वल निकम यांना विचारल्यानंतर त्यावर बोलताना ते म्हणाले की, राजकारणात सध्या जी अस्थिरता आणि गढूळता आहे ती बघून राजकारणात येण्याचा सध्या माझा विचार नाही, योग्य वाटत नाही.
याच आठवड्यात निकाल येण्याची शक्यता
ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.
घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा.. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे हे दोन्ही निकाल एकाच दिवशी येतात की एक आधी एक नंतर हेही पाहावं लागेल.
राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा (Supreme Court Result) आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. पण सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. 10 मे रोजी मतदान आहे. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतर (Karnataka Assembly Election) येतो का याची उत्सुकता आहे. तसं झालं तर 11 आणि 12 मे या दोन तारखा आणखी महत्वाच्या ठरतात.
ही बातमी वाचा: