(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhan Parishad Election : बाद मतांच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव
Vidhan Parishad Election Result : पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद करण्यात आलं आहे.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालाप्रमाणे आता विधानपरिषदेचा निकालही उशीरा लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर आणि भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद ठरवल्यानंतर या दोन्ही पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मतमोजणी लांबण्याची शक्यता आहे. पण सध्या बाद झालेली मतं बाजूला ठेऊन मतमोजणी सुरू असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर आणि भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद ठरवण्यात आलं. त्यामुळे एकूण 283 मतांसाठी मतमोजणी सुरू झाली. पण सुरुवातीला राष्ट्रवादीने त्याला आक्षेप घेतला. रामराजे यांच्या कोट्यातील तिसऱ्या पसंतीच्या मतावर भाजपने आक्षेप घेतला. त्यांनंतर हे मत बाद ठरवण्यात आलं.
राष्ट्रवादीनेही भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतला. त्यानंतर हे मतही बाद ठरवण्यात आलं. आता या दोन्ही पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. त्यामुळे मतमोजणी थांबली आहे.
काँग्रेसची तक्रार आणि मतमोजणीला विलंब
विधान परिषदेसाठी गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. परंतु भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसची ही तक्रार फेटाळली.