Aditya L-1 Mission :  चांद्रयान 3च्या मोठ्या यशानंतर आता भारतीय अंतराळ सशोधन संस्थेने (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन हे यान येत्या शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. हे यान पोलार सॅटेलाईट (PSLV-C57) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. लोकांना आता या आदित्य एल 1 (Aditya L-1 ) विषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 


आदित्य-L1 ला  लॅग्रेंज पॉईंटवर पाठवले जाणार (Aditya-L1 Will Be Sent To The Lagrange Point)


इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून लॅग्रेंज पॉईंट्सची नावे आहेत. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील L1 वर हे यान जाणार आहे तर पृथ्वीपासून L1 चे अंतर सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख किलोमीटर आहे. म्हणजेच आदित्य-एल1 पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर दूर पाठवले जाणार आहे. 


लॅग्रेंज पॉइंट म्हणजे काय? (What Is Lagrange Point)


प्रत्येक ग्रहाजवळ असे काही पाॅईंट असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याच्या तेथून निरीक्षणे नोंदवणे, अभ्यास करणे शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असे पाच पाॅईंट निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना लॅग्रेंज पॉईंट 1 ते 5 अशी नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी L-1 या पाॅईंटपर्यंत आदित्य यान जाणार आहे. तेथून ते निरीक्षणे नोंदवेल.


सूर्याचा अभ्यास कसा केला जाणार? (How The Sun Will Be Studied)


या सू्र्ययानात एकूण सात पेलोड आहेत. यातील सहा पेलोड इस्रोने तर एक पेलोड अन्य संस्थेने तयार केला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरचा वापर करून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण या सात पेलोडद्वारे करण्यात येणार आहेत.


आदित्य एल-1 मोहिमेचं उद्दिष्ट (Objective Of Aditya L-1 Mission)


आदित्य एल-1 ही भारताची पहिली सूर्य मोहिम आहे. याद्वारे सूर्य किरणांचा पृथ्वीवर होणारा नेमका परिणाम आणि वातावरणाचा अभ्यास केला जाईल. त्यासोबत सूर्यावरील आणि सभोवतालचं वातावरण, सौर वादळे आणि चुंबकीय वादळे तसेच त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम यांचा अभ्यास हे अंतराळयान करेल.


 


इतर महत्वाच्या बातम्या


ISRO: मिशन आर्यभट्ट ते आदित्य L1 व्हाया चांद्रयान; इस्रोचा 60 वर्षांचा अभूतपूर्व प्रवास