Asia Cup 2023 : यजमान पाकिस्तान संघाने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात नेपाळचा 238 धावांनी विराट पराभव करत दणक्यात सुरुवात केली. पाकिस्तानच्या या मोठ्या विजयामुळे भारतीय संघाची चिंता वाढली असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी, 2 सप्टेंबर रोजी लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये श्रीलंकामध्ये सामना होणार आहे. त्याआधी पाकिस्तानच्या कामगिरीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली असेल. प्रत्येक विभागात पाकिस्तानच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. फलंदाज आणि गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावीत केलेय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगतदार होणार आहे.
नेपाळविरोधात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 25 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार बाबर आझम याने परिस्थितीनुसार खेळ करत पाकिस्तानचा डाव सावरला. बाबर आझम याने 110 चेंडूचा सामना करत शतक ठोकले. त्यानंतर त्याने वेगाने धावा केल्या. पुढील 20 चेंडूत बाबरने 50 धावा जोडल्या. बाबर आझम याने आपल्या 151 धावांच्या खेळीमध्ये चार षटकार लगावले. बाबर आझमच्या जबरदस्त फॉर्ममुळे भारतीय संघाची चिंता वाढली असेल. इतकेच नाही तर इफ्तिखार अहमद यानेही विस्फोटक फलंदाजी केली. इफ्तिखार अहमद याने 71 चेंडूत 109 धावांची खेळी केली. इफ्तिखारचे हे वनडेमधील पहिले शतक होये. इफ्तिखारच्या फलंदाजीमुळे पाकिस्तानचा मध्यक्रम मजबूत असल्याचे दिसले.
प्रत्येक विभागात पाकिस्तान अव्वल -
पाकिस्तानच्या फलंदाजांनी आपले काम चोख बजावल्यानंतर गोलंदाजांनीही भेदक मारा केला. शाहिन आफ्रिदीने आपल्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या. नसीम शाह यानेही आपल्या पहिल्या षटकात विकेट घेतली. मधल्या षटकात हॅरिस रौफ याने भेदक मारा करत दोन विकेट घेतल्या. फिरकीपटूमध्ये शादाब खान याने अचूक टप्प्यावर मारा केला. शादाब खान याने नेपाळच्या चार फलंदाजांना बाद केले. पाकिस्तानची गोलंदाजीचा सामना करणे भारतीय फलंदाजांना सोपं नसेल. शादाबने 6.4 षटकात 27 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. नावाज याने फक्त एक षटक फेकत एक विकेट घेतली.
नेपाळविरोधात पाकिस्तान संघाने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अव्वल कामगिरी करत टीम इंडियाला इशाराच दिला आहे. नेपाळविरोधातील मोठ्या विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला असेल. भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून सराव सुरु केला आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना रंगणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.