श्रीहरीकोटा : इस्रोच्या सूर्य मोहिमेचं (Sun Mission) लाँचिंग 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून होणार आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर इस्रो आता मिशन आदित्य L1 (Mission Aditya) लाँच करणार आहे. तिरुपती जिल्ह्यातील श्रीहरिकोटा (Shriharikota) येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल-1 हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे, आता तुम्हाला देखील या सूर्य मोहिमेचं थेट प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथे उपस्थित राहून पाहता येणार आहे.
सूर्य मोहिमेचं लाँचिंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी काय करावं?
यावेळी इस्रोकडून आदित्य L1 मिशनचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सामान्यजणांना आमंत्रित केलं आहे. श्रीहरिकोटा येथील लाँच व्ह्यू गॅलरीमधून तुम्हाला सूर्य मोहिमेअंतर्गत होत असलेल्या आदित्य L1 मिशनचं थेट लाँचिंग अनुभवता येणार आहे. ISRO ने सांगितल्याप्रमाणे, भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा येथून हे मिशन लाँच केलं जाईल.
या लिंकवरुन करा नाव नोंदणी
या मिशनचं लाँचिंग थेट पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर नोंदणी (Resgistration) करावी लागेल. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन (ट्विटरवरुन) रजिस्ट्रेशनची लिंक (https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp) दिली आहे. 29 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही या लिंकवरुन तुमचं नाव रजिस्टर करू शकता.
सरकारमान्य ओळखपत्र अपलोड करणं गरजेचं
सूर्य मोहिमेचं लाँचिंग थेट पाहण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनवेळी तुमचं ओळखपत्र अपलोड करावं लागेल. भारताचं नागरिकत्व असलेलं कोणतंही सरकारमान्य ओळखपत्र तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करू शकता. यासोबत तुमचा फोन नंबर आणि ईमेल-आयडी सबमिट केल्यानंतर तुम्हाला या सूर्य मोहिमेच्या थेट प्रक्षेपणाचा पास मिळेल.
काय आहे मिशन आदित्य L-1 ?
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मिशन आदित्यविषयी माहिती दिली आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, "ही भारताची पहिलीच सूर्य मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान 2 सप्टेंबरला लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे."
हेही वाचा:
ISRO Mission Aditya : चंद्रानंतर आता मिशन आदित्य...काही दिवसांत इस्रो लाँच करणार 'आदित्य एल-1'