पुणे : पुण्यातील दापोडीच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग अर्थात सीएमईमध्ये सरावादरम्यान पूल बांधत असताना दोन जवानांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. ट्रेनिंग दरम्यान लोखंडी पूल बांधत असताना हा पूल जवानांच्या अंगावर कोसळला. ही घटना आज सकाळी घडली.  संजीवन पी के आणि भिवा वाघमोडे अशी मृत जवानांची नावं आहेत. मूळचे केरळ येथील संजीवन यांना खडकी येथील लष्करी रुग्णालयात सकाळी साडे अकरा वाजता उपचारासाठी दाखल केले होते. तर साडेबाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर  भरतगाव, दौंड येथील भिवा वाघमोडे यांचा देखील या घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच जवान जखमी झाले आहेत.

हे जवान दररोज सरावाचा एक भाग म्हणून प्रात्यक्षिक करत होते. त्या दरम्यान अपघात होऊन या दोन जवानांचा मृत्यू झाला. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रिजिंग एक्सरसाइज करत असताना ही दुर्घटना घडली. तर जेसीओसह पाच जवान जखमी झाले आहेत.


दापोडीचं कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग हे लष्काराच्या प्रशिक्षणासाठी देशातलं हे सर्वात महत्वाचं कॉलेज आहे. युद्ध काळात आणीबाणीच्या परिस्थितीत पूल बनवणं, लष्काराला मार्ग तयार करून देणं अशी अत्यंत महत्वाची कामं या जवानांना करावी लागतात. यासोबतच अन्य प्रकारचं प्रशिक्षण देखील जवानांना दिलं जातं. आज जवानांना सस्पेंशन ब्रिज बनविण्याचा सराव सुरू होता. त्यात सर्व जवान व्यस्त होते. त्याचवेळी एका बाजूला उभा केलेला टॉवर कोसळला आणि त्याखाली दोन जवान आले. सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग येथे पुलाचे काम सुरु असताना भरतगाव, दौंड येथील भिवा वाघमोडे यांच्यासह दोन जवान शहीद झाले. शहीद वाघमोडे यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.